विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यापीठ’ यशोदा मैया – कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे
‘विद्यापीठ आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ
नागपूर, २२ सप्टेंबर २०२५ :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे खरे पालक असून विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी “यशोदा मैया” प्रमाणे आहे, असे प्रतिपादन कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांनी केले. विद्यापीठाच्या महाविद्यालय संपर्क अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘विद्यापीठ आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ सोमवारी वर्धमान नगर येथील व्हिएमव्ही वाणिज्य, जेएमटी कला आणि जेजेपी विज्ञान महाविद्यालयातून करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवे पाऊल
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. माधवी खोडे चवरे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून राज्यपालनियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, अधिसभा सदस्य सुनील फुडके, श्री नागपूर गुजराती मंडळाचे व्यवस्थापन मंडळ सदस्य धीरजभाई पटेल, विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय मुद्गल उपस्थित होते.
कुलगुरूंनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या माता मंजुळाबाई वैद्यकीय सहायता निधी, कमवा व शिकवा योजना, विद्यार्थी सहायता निधी, सावित्रीबाई फुले योजना यांसह विविध उपक्रमांची माहिती दिली. “श्रीकृष्णाचा पालनपोषण यशोदा मायेनं जसा केला, तसंच विद्यापीठ विद्यार्थी कल्याणासाठी विविध योजनांद्वारे मातेसारखी भूमिका निभावत आहे,” असे त्या म्हणाल्या.

विद्यार्थी योजनांसाठी मोबाईल ॲप
विद्यार्थ्यांना सर्व योजनांची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी विद्यापीठाने विशेष मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमध्ये विद्यार्थी विकास योजना, शासकीय भरती, रोजगार संधी, इंटर्नशिप, कौशल्य प्रशिक्षण आणि स्थानिक उद्योगांमधील रोजगार संधीची सविस्तर माहिती दिली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे ॲप डाऊनलोड केल्यास गरजू विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असे आवाहन कुलगुरूंनी केले.
सामूहिक विद्यापीठ गीत गायनाचे आवाहन
११ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यापीठ परिसरात आयोजित सामूहिक विद्यापीठ गीत गायन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. खोडे चवरे यांनी केले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गीत गायनाचा व्हिडिओ तयार करून विद्यापीठाच्या दिलेल्या लिंकवर अपलोड करावा, असेही त्या म्हणाल्या.

योजनांचा लाभ घ्यावा – डॉ. समय बनसोड
विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे राज्यपालनियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांनी सांगितले. “योजनांसाठी तरतूद असली तरी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असल्याने निधीचा अल्प वापर होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आपल्या दारी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक मेळावा
२२ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान रेशीमबाग मैदानात आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय खंडाळ यांनी, तर संचालन डॉ. अमर बोंद्रे यांनी केले. आभार प्राचार्य डॉ. अभय मुद्गल यांनी मानले. महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
