‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या डिजिटल पोर्टल आणि स्टुडंट्स ॲप चा शुभारंभ
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पुणे येथील एम के सी एल (महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठासाठी डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टल व विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट्स ॲप च्या सुविधांचा शुभारंभ दि २७ मार्च रोजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर आणि एम के सी एल चे संस्थापक अध्यक्ष विवेक सावंत यांच्या हस्ते विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहामध्ये पार पडला. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासह कुलसचिव डॉ शशिकांत ढवळे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ डी एम खंदारे, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ पराग खडके, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ चंद्रकांत बाविस्कर यांची उपस्थिती होती.
डिजिटल युनिव्हर्सिटी पोर्टल आणि स्टुडंट्स ॲपद्वारे यापुढे विद्यार्थ्यांना घरबसल्या सर्व सुविधा मोबाईलद्वारे हाताळता येतील. याद्वारे प्रवेश प्रक्रिया करता येईल. संलग्नित महाविद्यालयांच्या नावाची यादीसह त्यामध्ये चालणाऱ्या विविध अभ्यासक्रमाची माहिती मिळवता येईल. परीक्षेचे वेळापत्रक व निकालही यामध्ये कळणार आहे. विविध शुल्काचे भरणा देखील या ॲपद्वारे करता येईल.
थोडक्यात विद्यापीठाला, महाविद्यालयांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना याचा भरपूर फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना ऍडमिशन ते कॉन्वोकेशन (प्रवेश ते डिग्री) यापुढे घरी बसून करता येणार आहे. यासाठी या दरम्यान होणाऱ्या प्रक्रियेसाठी विद्यापीठांमध्ये येण्याची गरज भासणार नाही. सदर अँप ची सुरुवात झालेली आहे. हे ॲप यावर्षी पदव्युतरच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात येणार आहे. पुढील वर्षापासून पदवीच्या विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ डी एम नेटके यांनी कळविले आहे.