गोंडवाना विद्यापीठाच्या युनिकनेक्ट ॲपचे लोकार्पण
विद्यार्थ्यांना शैक्षणिक,रोजगार व इतर अनुषंगिक माहिती मिळणार एका क्लिकवर
गडचिरोली : युनिकनेक्ट हे एक व्यापक व्यासपीठ आहे. जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक संसाधने, रोजगाराच्या संधी आणि वैयक्तिक विकासासाठी वनस्टॉप सोल्यूशन प्रदान करून उच्च शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी तयार करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी कनेक्ट ॲपच्या माध्यमातून सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि विद्यार्थी जोडणे सोपे झाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक, रोजगार व इतर अनुषंगिक माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
या ॲपचे लोकार्पण गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ प्रशांत बोकारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ अनिल हिरेखन, युनिकनेक्ट ॲपचे संस्थापक शुभम पाटील, सोहम खराबे, असिस्टंट प्रोग्रामर प्रमोद बोरकर आदी उपस्थित होते.
या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक माहिती जसे, विद्यापीठ व संलग्नीत सर्व महाविद्यालयाचे नोटिस, परीक्षा संबधीत माहिती, कार्यक्रमाचे परिपत्रक एका क्लिकवर एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व मागील प्रश्नपत्रिका बघता येणार असून निकालाबाबतची माहिती जाणून घेता येऊ शकेल. त्यासोबतच, ॲपमधील रेज्यूम बिल्डर हे फीचर विद्यार्थ्यांना त्यांचा रेज्यूम तयार करण्यास मदत करेल.
युनिकनेक्ट ॲप विद्यापीठाला प्रत्येक विद्यार्थ्यांशी जोडणारा एक प्लॅटफॉर्म आहे. हा विद्यार्थ्यांच्या रोजगार, शैक्षणिक प्रवासाला अधिक सुलभ व सोपा करण्यास मदत करेल. या प्लॅटफॉर्मवर विद्यापीठ, संलग्नीत महाविद्यालये आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सर्व एकत्र आल्यामुळे विद्यार्थ्यांना लागणारी सर्व शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी व जलद गतीने त्यांच्या मोबाईलवर नोटिफिकेशनसहित उपलब्ध होणार आहे.
त्यासोबतच रोजगार शोधक विद्यार्थी या प्लॅटफॉर्मवर जोडल्या गेल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी व उपलब्ध उद्योग कौशल्याची माहीती घेता येईल. नवीन शैक्षणिक धोरण (NEP) अंतर्गत परीसरातील सर्व कंपन्यांना रोजगार आणि इंटर्नशिपसाठी सर्व विद्यार्थ्यांपर्यंत रोजगाराबाबत असलेल्या उपलब्ध संधीची माहिती पोहोचविता येईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचा पहिला ड्रीम जॉब त्यांच्याच स्थानिक परीसरामध्ये शोधायला मदत होईल.
युनिकनेक्टची उद्दिष्टे :
सदर ॲप करिअर कनेक्ट, नोटिस बोर्ड, विद्यापीठ अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, निकाल, फीड्स आणि एआय-आधारित रेझ्युम बिल्डर यासारखी प्रमुख वैशिष्ट्ये उपलब्ध करुन देत विद्यापीठासाठी अधिकृत अॅप म्हणून काम करीत आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढणे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासात उत्कृष्ट होण्यासाठी सक्षम बनविणे आणि त्यांना उज्वल भविष्यासाठी तयार करणे हे युनिकनेक्टचे उद्दिष्ट आहे.
असे करा युनिकनेक्ट ॲप डाऊनलोड
युनिकनेक्ट ॲप गुगल प्ले-स्टोअर, ॲप्स स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सदर ॲप डाऊनलोड केल्यानंतर विद्यार्थ्यांने स्वत:चा ई-मेल आणि मोबाईल क्रमांक टाकावा. मोगाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीसह प्रमाणीकरण केल्यानंतर अर्जदाराचे नाव प्रविष्ट करुन नोंदणी फॉर्म भरावे. त्यानंतर ड्रॉपडाउन मेनूमधून अर्जदाराने विद्यापीठ, महाविद्यालय, स्ट्रीम व चालू वर्ष निवडावे. त्यानंतर वापरकर्त्यास ॲपच्या माध्यमातून उपयुक्त सुचना नियमित मिळत राहतील.