जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक विद्यापीठात ड्रोन डेव्हलपमेंट क्लबची सुरूवात

ड्रोन तंत्रज्ञान वास्तविक समस्यांचे समाधान करेल – डॉ सुनील ढोरे यांचे मत

पुणे : कृषी, आपत्ती व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स आणि संरक्षण यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचे वापर आणि त्यांचे परिवर्तनक्षम सामर्थ्य आहे. ड्रोन तंत्रज्ञान केवळ तांत्रिक प्रगतीसाठीच नव्हे तर वास्तविक जगातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्वाचे ठरत आहे, असे मत प्रमुख पाहुणे आणि आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणेचे संगणक विकास विभाग प्रमुख डॉ सुनील ढोरे यांनी व्यक्त केले.

जी एच रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक विद्यापीठाद्वारे नुकतेच ड्रोन डेव्हलपमेंट क्लबची सुरूवात केली. याच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ एम यू खरात, जी एच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटचे परिसर डायरेक्टर डॉ आर डी खराडकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ जितेंद्र कुमार मिश्रा, परीक्षा विभाग संचालक दयानंद सूर्यवंशी, कार्यक्रम आणि क्लब समन्वयक काजल खोब्रागडे आणि क्लब समन्वयक प्रा अमित कुमार उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना, सृजनशीलता आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण वाढवणे हा होता. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या “योमधारा” नावाच्या एअरबोर्न स्काउट्स गटाने प्रथम पारितोषिक जिंकले तर “कृषीएक्सपर्ट” नावाच्या उडान गटाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

Advertisement

डॉ सुनील ढोरे म्हणाले, संरक्षण क्षेत्रात ड्रोन सुरक्षा उद्देशाने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. विद्यार्थ्यांनी ड्रोन तंत्रज्ञानाच्या भविष्यातील शक्यता स्वीकाराव्यात आणि त्याचा उपयोग तांत्रिक प्रगतीबरोबरच वास्तविक समस्यांचे निराकरण करण्यासाठी करावा.

कुलगुरू डॉ एम यू खरात म्हणाले की, विद्यापीठात प्रथमच विविध विद्यार्थी गटांनी अत्याधुनिक ड्रोन प्रोटोटाइप्स आणि उपाययोजनांच्या सादरीकरण केले. त्यांच्या नवकल्पनांना पंख देण्यासाठी विद्यापीठाने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. उत्कृष्ट सादरीकरणाला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सहभागीने केलेली मेहनत आणि त्यांच्याद्वारे आणलेल्या सृजनशील उपाययोजना ह्या समाजाच्या हितासाठी कामाला येतील, अशी अपेक्षा आहे.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्रेयश रायसोनी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page