कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाद्वारे डॉ के रा जोशी स्मृती व्याख्यानमाला संपन्न

वैदिक जीवनपद्धती ही आदर्श जीवनपद्धती – प्रो. रामराज उपाध्याय

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या शास्त्रगुरुकुलम् तर्फे नागपुरातील सुप्रसिद्ध संस्कृत विद्वान् डॉ. के. रा. जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवार, दि. 30 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली. डॉ. के. रा. जोशी यांच्या कार्यकर्तृत्वाचे कृतज्ञतापर स्मरण करण्यासाठी दरवर्षी विश्वविद्यालयातर्फे व्याख्यानमालेचे आयोजन दरवर्षी केले जाते. डॉ. केशव रामराव जोशी हे दर्शन, व्याकरण, साहित्यादि शास्त्रांचे प्रगाढ विद्वान् म्हणून राष्ट्रीय स्तरावर प्रख्यात होते. त्यांनी नागपुर विद्यापीठाच्या संस्कृत विभागाचे विभागाध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या या संस्कृत क्षेत्रातील असामान्य कार्यासाठी राष्ट्रपती प्रमाणपत्रासह अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या विविध प्राधिकारिणींवर त्यांनी कार्य केले असून, त्यांचे निरंतर मार्गदर्शन विश्वविद्यालयाला लाभले आहे.

व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख व्याख्याते प्रो. रामराज उपाध्याय, विभागाध्यक्ष, पुरोहित विद्या विभाग, श्री. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली, कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, प्रो. हरेकृष्ण अगस्ती, संचालक, रामटेक शैक्षणिक परिसर, व्याख्यानमाला संयोजक डॉ. राघवेंद्र भट उपस्थित होते. व्याख्यानमालेचा प्रारंभ विनायकशास्त्री जोशी यांच्या वेदमंत्रघोषाने झाला. शास्त्रविद्यागुरुकुलम्चे संचालक डॉ. राघवेंद्र भट यांनी व्याख्यानमालेच्या आयोजनामागची भूमिका आणि डॉ. जोशी यांच्या संस्कृत शास्त्रांमधील संशोधन व योगदानाचा परिचय करून दिला.

Advertisement

हया व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प सामवेदाचे प्रख्यात विद्वान् प्रो. रामराज उपाध्याय, विभागाध्यक्ष, पुरोहित विद्या विभाग, श्री. लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली यांनी गुंफले. ‘कल्पसूत्रे व वेद’ याविषयावरील आपल्या वक्तव्यात प्रो. उपाध्याय म्हणाले, “वैदिक जीवन ही आदर्श जीवन पद्धती आहे. भारतीय संस्कृती ही देवसंस्कृती आहे. या संस्कृतीत जीवनाचे शिस्तबद्ध नियमन व विभाजन केले आहे. वर्णाश्रमविचार, पुरुषार्थ चतुष्टय विचार हा त्यातूनच निर्माण झाला आहे. वेदांगामधील एक असलेले कल्पसूत्र विविध वैदिक कर्मकांडांच्या आचरणाचे नियम सांगते. कल्पसूत्राचे श्रौत, गृह्य, धर्म आणि शुल्ब असे चार प्रकार आहेत. वैदिक जीवन पद्धतीचा अंगिकार हा या सर्व वेद, वेदांगे यांचे अध्ययन आणि त्यात सांगितलेल्या आचरण-व्यवहाराच्या नियमानुसार होत असतो. केवळ ज्ञान किंवा केवळ अनुभव किंवा केवळ तप याने जीवन सफल होत नाही तर ज्ञान, स्वाध्याय, प्रवचन आणि व्यवहार या चतुष्टयीनेच मनुष्यजीवन सफल सार्थक ठरते.”

अध्यक्षीय भाषणात प्रो हरेराम त्रिपाठी म्हणाले, डॉ. के. रा. जोशी यांच्यासारखे विद्वान् हे आपल्या नागपुरचे आणि विश्वविद्यालयाचे भूषण आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिलेल्या देणगीतून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. त्यासाठी डॉ. जोशी परिवाराचा मी आभारी आहे. विद्वान् पित्याचा वारसा त्यांची सुविद्य मुले चालवित आहे हे प्रशंसनीय आहे. ही व्याख्यानमाला राष्ट्रीय व्हावी यासाठी भारताच्या सर्व प्रांतातील शास्त्रविद्वानांना आपण निमंत्रित करणार आहोत. आजच्या व्याख्यानाचा विषय हा वेद आणि कल्पसूत्रे असा आहे. वेद, वैदिक वाङ्मयाचा सखोल व सूक्ष्म अध्ययन असणा-या प्रो. उपाध्याय हे आज व्याख्यान देणार आहेत. भारतीय ज्ञान परंपरेतील सर्व शास्त्रविचारांचा परामर्श विभिन्न शास्त्रविद्वानांच्या व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी घ्यावा हेच या व्याख्यानमालिकांच्या आयोजनाचे प्रयोजन होय.

प्रा. सचिन द्विवेदी यांची संचालन केले तर आभार डॉ. श्वेता शर्मा यांनी मानले. प्रा. अमित भार्गव आणि प्रा. निशिथ मिश्र यांनी व्याख्यानमालेसाठी सहकार्य केले. या व्याख्यानमालेला डॉ. जोशी यांचे कुटुंबीय विशेषत्वाने उपस्थित होते. तसेच अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकसंस्कृतानुरागी, अभ्यासक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page