विश्वकर्मा विद्यापीठाच्यावतीने ‘गरिमा’ या कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
पुणे : विश्वकर्मा विद्यापीठाच्यावतीने आयोजित केलेल्या गरिमा या तीन महिन्यांच्या कराटे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार, १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विभाग व महिला सक्षमीकरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश महिलांना आत्मसंरक्षणाच्या तंत्रांचे प्रशिक्षण देऊन त्यांना सशक्त बनवून आजच्या आवाहनात्मक परिस्थितीसाठी सक्षम करणे हा आहे.
उद्घाटन समारंभाची सुरुवात विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ वासुदेव गाडे यांच्या अभिनंदनपर भाषणाने झाली. त्यांनी आजच्या काळात फिटनेस आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “आजच्या जगात जिथे महिलांविरुद्धचे गुन्हे वाढत आहेत, त्या या प्रकारच्या प्रशिक्षणाची गरज खूप महत्त्वाची आहे. फिटनेस खूप महत्त्वाचा आहे आणि हा कार्यक्रम महिलांसाठी प्रभावी आत्मसंरक्षण तंत्र शिकवून त्यांना दीर्घकालीन फायदे होतील. कराटेसारख्या उपक्रमामुळे विशेषतः, महिलांचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य वाढवण्यासाठी खूप मदत होईल.”
डॉ गाडे यांनी पुढे सांगितले की या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आतापर्यंत ६८ विद्यार्थिनींनी नोंदणी केली असून त्यांनी आशा व्यक्त केली की हा आकडा आणखी वाढेल. ते म्हणाले, “जेव्हा या हे प्रशिक्षण पूर्ण करतील, तेव्हा त्यांच्याकडे असा आत्मविश्वास असेल जो त्यांना भविष्यकाळात मदत करेल. विश्वकर्मा विद्यापीठ आपल्या महिला कर्मचारी व विद्यार्थिनींना सक्षम बनवण्यासाठी कायम कटिबद्ध आहे.”
डॉ गाडे यांच्या भाषणानंतर, महिला सक्षमीकरण केंद्राच्या संचालिका डॉ पश्मीना दोशी यांनी गरिमा या नावामागील अर्थ स्पष्ट केला, जो प्रतिष्ठा, अभिमान आणि सन्मान यांचा प्रतिनिधित्व करतो. त्यांनी विद्यापीठाला धन्यवाद देत सांगितले की, “हे प्रशिक्षण काळाची गरज आहे. हे प्रशिक्षण तीन महिने आठवड्यातून तीन वेळा होणार आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश मुलींना त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सशक्त करणे आहे, जेणेकरून त्यांना इतरांवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.”
कार्यक्रमाचा समारोप प्रशिक्षक राजेश सोळंकी यांच्या भाषणाने झाला. त्यांना कराटे क्षेत्रात ४० वर्षांचा अनुभव असून राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील अनेक पदके मिळाली आहेत. त्यांनी कराटेचे व्यापक फायदे स्पष्ट करताना सांगितले, “कराटेमुळे केवळ कौशल्ये आणि शक्ती विकसित होत नाहीत, तर एक असे व्यक्तिमत्व घडते जे आयुष्यभर टिकते. कराटे म्हणजे रिकाम्या हाताने संरक्षण तंत्र आहे आणि प्रत्येकाने ते शिकले पाहिजे कारण ते तुमची ताकद आणि कौशल्ये वाढवते. या प्रशिक्षणादरम्यान, मी तुम्हाला पंचेस, ब्लॉक्स आणि किक्स शिकवणार आहे म्हणून तयार व्हा आणि नवीन कौशल्ये आत्मसात करा.”
उद्घाटन समारंभाच्या शेवटी सोळंकी यांनी उपस्थितांसोबत कार्यशाळा घेतली, ज्यामध्ये त्यांनी सुरुवातीचे काही व्यायामप्रकार करून घेत काही मूलभूत आत्मसंरक्षण तंत्रांची ओळख करून दिली.