एमजीएम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या मांडणीची काला घोडा महोत्सवात प्रशंसा
साधनसंपत्ती आणि निसर्ग वाचवण्याचा दिला संदेश
छत्रपती संभाजीनगर : हिंसा घडविणारे शस्त्र अहिंसेचा संदेश देण्यामध्ये कसे रुपांतरित केले जाऊ शकते यासंदर्भात कलात्मक संदेश देणारी महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची मांडणी मुंबईतील कालाघोडा महोत्सवात भेट देणाऱ्यांना आकर्षित करत आहे. विद्यापीठाच्या लिओनार्दो दा विंची स्कूल ऑफ डिझाईन’च्या भाग्यश्री घोडके, प्रांजली खुपसे, वैष्णवी देशमुख, प्रसाद गायकवाड, रंगनाथ वेताळ, गौरव हिवाळे या विद्यार्थ्यांनी या महोत्सवात सहभागी होत ही मांडणी केली आहे.
शस्त्र अस्त्रांची निर्मिती आणि वापर थांबवायला हवा कारण यात आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा दुरुपयोग होतो. हिंसा नैसर्गिक साधनसंपत्ती उद्ध्वस्त करते तसेच मानवजातीसाठी घातक आहे. शाश्वत निसर्ग ही या मागची संकल्पना आहे. या कलाकृती सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी या विषयासंदर्भातली आपली तळमळ, बांधिलकी आणि सुरक्षीततेची भावना स्पष्ट केली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना या मांडणीच्या माध्यमातून संशोधन आणि नवोन्मेषाची प्रेरणा प्राप्त होईल असे विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी यावेळी सांगितले. कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, अधिष्ठाता डॉ. मोनिका अग्रवाल यांनी सादरीकरणात सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. राजेश शाह, प्रा. माखनलाल विश्वकर्मा आणि प्रा. सचिन कांबळे यांनी या प्रकल्पामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.