जळगाव येथे एईडीपी संदर्भात तीन विद्यापीठांची संयुक्त बैठक पार पडली

विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी एप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्रामची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (छत्रपती संभाजीनगर) यांच्या संलग्नित आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये एप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम (AEDP) उपकेंद्रांबाबत संयुक्त बैठक आज जळगाव येथे पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी होते. यावेळी राज्य सुकाणू समितीचे सदस्य सीए अनिल राव, भरत अमळकर (राज्यस्तरीय उपगट समिती अध्यक्ष), प्र-कुलगुरु प्रा. एस.टी. इंगळे, प्रा. ए.एम. महाजन (स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ), प्रा. वाल्मीक सरवदे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ) मंचावर उपस्थित होते.

राज्य सुकाणू समिती सदस्य सीए अनिल राव यांनी सांगितले की, एईडीपीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठांकडे पर्यवेक्षण आणि नियंत्रणाचे अधिकार राहतील. तर भरत अमळकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणात घटलेली नोंद चिंतेची बाब असून, एईडीपी रोजगारक्षम शिक्षणासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

Advertisement

प्र-कुलगुरु प्रा. ए.एम. महाजन यांनी आपल्या विद्यापीठात ९ कोर्सेस सुरू होणार असल्याचे सांगितले, तर प्रा. सरवदे यांनी ५ नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची माहिती दिली. प्रा. एस.टी. इंगळे यांनी जळगाव विद्यापीठात तीन नवीन अभ्यासक्रम — बी.ए. ह्युमॅनिटीज व सिव्हिल सर्व्हिसेस, बी.एस्सी. अप्लाईड बायोलॉजी, बी.कॉम. रिटेल मॅनेजमेंट — लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.

बैठकीत तीनही विद्यापीठांसाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली आहे. या समितीने आपला अहवाल ५ जूनपर्यंत सादर करायचा आहे. तसेच, १५ जूनपर्यंत विद्यापीठांनी आपापल्या अभ्यासक्रमांची माहिती राज्य सुकाणू समितीकडे पाठवायची आहे.

अध्यक्षीय समारोपात कुलगुरु प्रा. माहेश्वरी यांनी इंटर्नशिप, ऑन-जॉब ट्रेनिंग आणि एईडीपीमधील फरक स्पष्ट करत, या अभ्यासक्रमांत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येईल, अशी माहिती दिली.

बैठकीस प्रास्ताविक प्रा. एस.टी. इंगळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. अनिल डोंगरे यांनी केले. यावेळी तिन्ही विद्यापीठांतील प्राध्यापक, प्राचार्य, आणि IQAC संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *