संस्कृत विश्वविद्यालयात जगद्गुरू श्रीशंकराचार्य एकदिवसीय राष्ट्रीय विचारसंगोष्ठी संपन्न

श्रीशंकराचार्यानी भारताची अखंडता व एकात्मता रुजविण्याचे मह‌कार्य केले – डॉ लीना रस्तोगी

श्रीशंकराचार्य भारताचा आत्मा, भारताची आध्यात्मिक संस्था – प्रो मधुसूदन पेन्ना

श्रीशंकराचार्य हे श्रुतिपरंपरेचे अग्रदूत – कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डेय

रामटेक : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचा अभिनवभारती शैक्षणिक परिसर, भारतीय दर्शन विभाग आणि भारतीय भाषा समिती नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्‌गुरू श्रीशंकराचार्य एकदिवसीय राष्ट्रीय विचारसंगोष्ठीचे आयोजन गुरुवार, दि. 28 मार्च 2024 रोजी नागपूर येथे करण्यात आले होते. या राष्ट्रीय संगोष्ठीसाठी भारतीय भाषा समिती, नवी दिल्लीद्वारे आर्थिक अनुदान प्राप्त झाले आहे. कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांच्या प्रेरणेने आयोजित या राष्ट्रीय संगोष्ठीचे अध्यक्षपद पूर्व कुलगुरू प्रो मधुसूदन पेन्ना, अधिष्ठाता, भारतीय धर्म, तत्त्वज्ञान तथा संस्कृती संकाय यांनी भूषविले.

प्रमुख अतिथी व व्याख्याता या नात्याने ज्येष्ठ संस्कृती विदुषी डॉ. लीना रस्तोगी, या राष्ट्रीय संगोष्ठीचे समन्वयक व कुलसचिव प्रो कृष्णकुमार पाण्डेय विशेषत्वाने उपस्थित होते. राष्ट्रीय संगोष्ठीत व्याख्याता या नात्याने डॉ लीना रस्तोगी, प्रो मधुसूदन पेन्ना, पूर्व अधिष्ठाता प्रो नंदा पुरी आणि शास्त्रविद्यागुरुकुलम्चे संचालक डॉ राघवेंद्र भट उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने झाला. समन्वयक प्रो कृष्णकुमार पाण्डेय यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात प्रो पाण्डेय यांनी आदि श्रीशंकराचार्य यांच्या जीवन, तत्त्वज्ञान व योगदानावर आधारित या राष्ट्रीय विचारगोष्ठीचे स्वरूप विशद केले. श्रीशंकराचार्यानी सनातन धर्माचे पुनरुज्जीवन आणि भारतयात्रेद्वारे एकात्मता रुजविण्याचे महद्‌कार्य केले आहे. त्यांचे जीवन, योगदान आणि विचारपरंपरा यांचे नव्या पिढीला आकलन व्हावे यासाठी या विशेष विचारगोष्ठींचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय भाषा समितीने श्रीशंकराचार्याच्या या योगदानावर अशा विचारगोष्ठींसाठी प्रोत्साहन दिले ही आनंदाची बाब असल्याचे प्रशंसोद्गार कुलसचिव प्रो. पाण्डेय यांनी सांगितले. श्रीशंकराचार्य हे श्रुतिपरंपरेचे अग्रदूत, सनातनपरंपरेचे उद्धारक आहेत. त्यांनी चारही दिशांत चार मठांची स्थापना करून संपूर्ण भारताला एकात्मतेच्या सूत्रात गुंफले आहे. श्रीशंकराचार्य हा भारताचा स्वाभिमान, आत्मगौरव असून त्यांच्या वाङ्मयाचे चिंतन-मनन व्हावे यासाठीच या राष्ट्रीय विचारगोष्ठींचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

प्रमुख अतिथी व वक्त्या डॉ लीना रस्तोगी यांनी रसाळ विवेचनातून ‘श्रीशंकराचार्य आणि भारताची एकात्मता’ या विषयावर व्याख्यान दिले. श्रीशंकराचार्यानी भारताची एकात्मता कशी तयार केली किंवा त्यासाठी विविध स्तरावर कसे प्रयास केले याचा पद्धतशीर विचार डॉ. रस्तोगी यांनी मांडला. त्या म्हणाल्या, श्रीशंकराचार्याच्या काळात विविध संप्रदाय, पंथ होते त्यामध्ये विरोध होता, विसंगती होती ती दूर करण्यासाठी त्यांनी पंचायतन पूजेचा विचार मांडला. गणेश, विष्णु, शिव, शक्ती आणि सूर्य या पंच देवतांच्या पूजेचे शास्त्रीय व धार्मिक प्रयोजन त्यांनी लक्षात घेवून ही पूजा स्वीकृत केली. त्यांनी तीनदा अखंड भारत यात्रा केली त्याद्वारे चारही दिशांमध्ये चार मठ तेही चार वेद आणि चार महावाक्यांनी संबद्ध केले. भारतात भलेही भाषा, धर्म, पंथ, जाति भिन्न असू देत परंतु भारताचा आत्मा एकच आहे याचा साक्षात्कार त्यांच्या सर्वच साहित्य, भाष्ये, स्तोत्रवाड्मयातून दिसून येतो.

सत्तात्रयाचा सिद्धांतही याच एकात्मतेचा भाग आहे. प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक सत्ता या तीनही सत्तांचा समन्वय साधून त्यांनी विरोध नष्ट केला आहे. त्यांनी भौगोलिक, सांस्कृतिक, सांप्रदायिक, वांशिक, वैचारिक सर्व भेद मिटवून भारताची अखंडता व एकात्मता विविध प्रकारे दाखवून दिली, प्रसारित केली व रुजविली. भिन्नता असलीच तर ती नाम व रूपात आहे परंतु सर्वाचा आत्मा एकच आहे आणि तो ब्रह्माचा अंश आहे याचे प्रतिपादन त्यांनी अद्वैत सिद्धान्ताच्या माध्यमातून केले. त्यांची ही समन्वयात्मक विशिष्ट दृष्टी ही 19 व्या शतकात प्रज्ञाचक्षु श्रीगुलाबराव महाराजांनी दाखविली आहे. श्रीशंकराचार्याच्या योगदानाचे स्मरण कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाने अतिशय औचित्यपूर्वक केले यासाठी त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक, दर्शनशास्त्राचे गाढे विद्वान्, अभिनवभारती परिसराचे संचालक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रो. मधुसूदन पेन्ना यांनी श्रीशंकराचार्याचा जीवनपट संक्षेपात उलगडून

दाखविले. त्यांनी गोविंद भागवत् पाद तसेच व्यासमहर्षी यांच्याकडून शास्त्रशिक्षण घेतले. श्रीशंकराचार्यानी श्रुती, स्मृती व पुराण यांचे संदर्भ आपल्या साहित्यात घेतले कारण इतिहास व पुराण यांच्या अध्ययनानेच सिद्धान्त प्रतिपादन परिपूर्ण करता येते याचे संज्ञान त्यांना होते; त्यामुळे पूर्वीच्या आचार्यानी प्रतिपादन केलेल्या सिद्धान्तात राहिलेल्या त्रुटी आपल्या समन्वयात्मक दृष्टीतून परिपूर्ण केल्या. श्रीशंकराचार्यानी आध्यात्मिक प्रणाली प्रतिष्ठापित केली आणि सर्वांना राजमार्ग खुला करून दिला. शंकराचार्याच्या विरोधकांनाही त्यांचे सिद्धान्त प्रतिपादन करण्याकरिता व खंडनाकरिता का होईना पण श्रीशंकराचार्य यांचे विचार उद्धृत करावेच लागले आहे. श्रीशंकराचार्य हे योगी, ज्ञानी होते ते भारताचा आत्मा आहेत. ते भारताच्या आध्यात्माची संस्था आहेत. त्यांनी भारताला सामाजिक, तात्त्विक, सांस्कृतिक, आध्यात्मिक दृष्ट्या एका सूत्रात गोवले, भारताच्या सनातन धर्माची ध्वजा उंचावली हे त्यांचे योगदान विलक्षण आणि एकमेवाद्वितीय आहे.

याप्रसंगी पूर्व अधिष्ठाता प्रो. नंदा पुरी आणि डॉ. राघवेंद्र भट, संचालक, शास्त्रविद्यागुरुकुलम् यांचीही भाषणे झाली.

कार्यक्रमाचे संचालन चर्चासत्राच्या सहसंयोजिका डॉ रेणुका करंदीकर यांनी तर सत्रांचे संचालन डॉ मृदुला तापस यांनी केले आणि आभार डॉ पल्लवी कावळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page