शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ डी टी शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व वित्त व लेखा अधिकारी एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनतून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पोस्टर प्रेझेंटेशन व रांगोळी स्पर्धाचे आयोजन तंत्रज्ञान अधिविभाग, कोल्हापूर येथे करण्यात आले. या स्पर्धांसाठी इन्स्पायर इनक्यूजन, रोल ऑफ वुमेन इन लिडरशीप व आंत्ररप्रनरशिप, रोल ऑफ वुमेन इन नेचर कॉन्झर्वेशन, रोल ऑफ वुमेन इन रोड सेफटी, रोल ऑफ वुमेन इन इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नॉलॉजी, रोल ऑफ वुमेन इन रिसर्च अॅण्ड इनोव्हेशन असे विषय ठेवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. एस. एन. सपली यांच्या हस्ते झाले. या स्पर्धांना कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेकम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरींग, सिव्हिल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग, फूड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी या शाखांमधील बी. टेक्., एम्. टेक. व एम्. एस्सी. च्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या समोरील सद्य परिस्थितील आव्हाने, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्वावलंबन, राजकीय सहभाग, उच्च पदांवर स्थान, संशोधनातील योगदान, अशा विविध विषयांवर विचारमंथन झाले. महिला करिअर व घर सांभाळताना खरोखरच तारेवरची कसरत करत असतात. महिलांच्या पंखांना बळ दिल्यास अवकाशात झेपावत उत्तुंग यशाला गवसणी घालतात हे खरेच. पण, यासाठी अजूनही सामजिक दृष्टीकोन बदलण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पुनश्री फडणीस, सहाय्यक प्राध्यापक व शितल देहानकर, सहाय्यक प्राध्यापक यांनी इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन सेल, शिवाजी युनिव्हर्सिटी सेंटर इनोव्हेशन फॉर इनक्युबेशन लिंकेजेस, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर रिसर्च अॅण्ड डेव्हल्पमेंट, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने केले. स्पर्धेचे परीक्षण डॉ. वैशाली सावंत, सहयोगी प्राध्यापक यांनी केले. कार्यक्रमास डॉ. पी. डी. पाटील, डॉ. व्ही. एस. पाटील, एच. ए. पंडीत, टी. आर. पाटील व इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते.