राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘आपत्ती व असुरक्षितता’ विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि पियर्स कॉलेज वॉशिंग्टन यांचे संयुक्त आयोजन

नागपूर : ‘आपत्ती आणि असुरक्षितता’ या विषयावर आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वेबिनार मंगळवार दि २७ मे २०२५ रोजी पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि पियर्स कॉलेज वाशिंग्टन, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि पियर्स कॉलेज वॉशिंग्टन यांच्या शैक्षणिक सहकार्य कार्यक्रम अंतर्गत ‘आपत्ती आणि असुरक्षितता’ या विषयावर एक आंतरराष्ट्रीय वेबिनार यशस्वीरित्या घेण्यात आला. या वेबिनारमध्ये दोन्ही देशांतील तज्ज्ञ मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत या विषयावर चर्चा केली. भारत व अमेरिकेतील आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा आणि तयारीच्या प्रणालींवर या वेबिनारमध्ये विचार विनिमय करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे नोडल ऑफिसर डॉ विकास जांभूळकर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) संचालक डॉ स्मिता आचार्य व डॉ विजय तांगडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून वेबिनारसाठी उपस्थित होते.

International webinar on 'Disaster and Insecurity' at Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University

वेबिनारचे उद्घाटन संयोजक डॉ सुप्रिया डेव्हिड यांनी केले. डॉ सुप्रिया यांनी या विषयाची गरज, सार्वजनिक सुरक्षा व आपत्कालीन तयारी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य वाढवण्याचा उद्देश स्पष्ट केला. परिसंवादात मेघना मंडल यांनी तज्ञ वक्ते नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूरचे प्रोफेसर डॉ अनंत आरसोनटक्के आणि अ‍ॅडजंक्ट असिस्टंट प्रोफेसर, पियर्स कॉलेज वॉशिंग्टन लेनोरा बोर्चार्ड्ट याची ओळख करून दिली. व्याख्याते त्यांच्या देशातील अग्निसुरक्षा, अभियांत्रिकी व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील मान्यताप्राप्त तज्ञ आहेत.

Advertisement

तांत्रिक सत्राची सुरुवात लेनोरा बोर्चार्ड्ट यांनी केली. अमेरिकेतील आपत्कालीन व्यवस्थापनाच्या व्यावहारिक पैलूंवर लेनोरा बोर्चार्ड्ट यांनी लक्ष केंद्रित करून माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापनाची तयारी, धोरणे, रेडिओलॉजिकल आपत्कालीन नियम आणि सार्वजनिक सहभागाची भूमिका सविस्तर त्यांनी मांडली. यानंतर डॉ अनंत सोनटक्के यांनी भारतीय अग्निसुरक्षा व आपत्ती कमी करण्याच्या फ्रेमवर्कवर प्रकाश टाकला. औद्योगिक व संस्थात्मक अग्निसुरक्षा व्यवस्थांवरील त्यांचा व्यापक अनुभव सांगितला.

इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याची जोखीम, जंगल आगीतून निर्माण होणाऱ्या धोक्यांबाबत माहिती देत विविध क्षेत्रांतील संस्था यंत्रणांची तुलना केली. वक्त्यांनी सादर केलेल्या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमुळे दोन्ही देशांतील आपत्ती व्यवस्थापन प्रणालीशी संबंधित यंत्रणा आणि असुरक्षिततेवर सखोल माहिती सहभागींना मिळाली. या तुलनात्मक दृष्टिकोनामुळे सहभागी प्रतिनिधींना जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाची सविस्तर माहिती प्राप्त झाली.

यानंतर प्रश्नोत्तर सत्र झाले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना तज्ञांनी सविस्तर उत्तरे दिली. या संवादातून सहभागींची उत्सुकता आणि शैक्षणिक समज वाढली. डॉ सुप्रिया डेव्हिड यांनी आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वेबिनारचा समारोप केला. यावेळी त्यांनी सत्रातील महत्त्वाचे मुद्दे संक्षेपात मांडले, तसेच या अर्थपूर्ण शैक्षणिक संवादासाठी दोन्ही संस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे आभार मानले. श्रीवर्धन केकतपुरे यांनी आभार व्यक्त केले. आयोजक, शिक्षक, विद्यार्थी, सहभागी आणि विशेषत: वैभव तुंबडे, अनुश्री, रमण शिवणकर, अंकुश मराठे आणि तांत्रिक टीम यांचे मनापासून आभार मानले. वेबिनारकरिता २८८ जणांनी नोंदणी केली गेली होती. प्रत्यक्षात ऑनलाइन पोर्टलवर १४० प्रतिनिधी सक्रियपणे सत्रात सहभागी झाले होते. वेबिनार श्रीवर्धन केकतपुरे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *