शिवाजी विद्यापीठात ‘कॉम्पिटिटीव्ह स्पोर्ट्स अँड ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज्’ वर आंतरराष्ट्रीय वेबिनार

कोल्हापूर :  क्रीडापटूंनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीकडेही जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. खेळत असताना उद्भवणाऱ्या ताणतणावांचा सामना जितक्या सहजतेने करता येईल, तितका खेळ उंचावणे शक्य होईल. त्या दृष्टीने त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांच्या मानसिकतेवर काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील टेक्सास येथील मिड वेस्टर्न स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक व क्रीडातज्ज्ञ डॉ. फ्रँक बी. व्हेट यांनी काल येथे केले.शिवाजी विद्यापीठ आणि मीड वेस्टर्न स्टेट युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने काल (दि. १७) सायंकाळी ६ ते १० या कालावधीत ‘कॉम्पिटिटीव्ह स्पोर्ट्स अँड ग्लोबल ऑपॉर्च्युनिटीज्’ या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबविनारमध्ये डॉ. व्हेट हे ‘फिजिऑलॉजिकल थ्रेशोल्ड इन ट्रेनिंग दि कॉम्पिटिटीव्ह स्पोर्ट्स’ या विषयावर बोलत होते.शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरु डॉ. प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन होते तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे,  क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे प्रमुख उपस्थित होते.

Advertisement

डॉ. फ्रँक व्हेट म्हणाले, भारतीय क्रीडापटू आणि प्रशिक्षक व मार्गदर्शक हे क्रीडापटूंच्या शारीरिक तंदुरुस्तीवर काम मोठ्या प्रमाणावर करतात. पण, त्यांचा भर हा केवळ स्नायूंच्या पिळदारपणावर आणि सक्षमतेकडे अधिक असतो. तसे करणे योग्यच आहे. मात्र, त्याच्या बरोबरीने शरीरातील विविध संस्था, जसे की, रक्ताभिसरण, श्वासोच्छवास आदींच्या क्षमतावर्धनाकडेही अधिकाधिक लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे शारीरिक स्वास्थ्य व तंदुरुस्ती दीर्घकाळ टिकविणे शक्य होते. डॉ. व्हेट यांनी खेळाडूंना प्रशिक्षण कसे द्यावे व त्या प्रशिक्षणाचे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात, या विषयी उपस्थित क्रीडा प्रशिक्षकांना व खेळाडूंना सविस्तर मार्गदर्शन केले.

International Webinar on 'Competitive Sports and Global Opportunities' at Shivaji University Kolhapur

यावेळी डॉ. सेथ स्केल्टन यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा शिक्षण कशा पद्धतीने घेता येते, खेळाडूंना आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी काय करावे, याचे मार्गदर्शन केले. पल्लवी देसाई यांनी विविध विद्यापीठांमध्ये पदवी व पदव्युत्तर क्रीडा व शारीरिक शिक्षण कसे प्राप्त करता येते, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि तांत्रिक बाबींविषयी मार्गदर्शन केले.

या वेबिनारचे आयोजन शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाद्वारे करण्यात आले. डॉ. शरद बनसोडे यांनी वेबिनारचे संचालन केले. यशस्वी आयोजनासाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक गौरेश पवार, अक्षय कारेकर, डॉ. रोहित पाटील, पृथ्वीराज सरनाईक, सुचय खोपडे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page