सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डेक्कन कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र संपन्न
इंडॉलॉजी क्षेत्रातील जगभरातील अभ्यासकांचा सहभाग
पुणे : सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या इंडॉलॉजी विद्याशाखेतील (Indological Studies) अप्रतिम योगदानाच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यशताब्दी वर्षानिमित्त (१९२५–२०२५), डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ) व डेक्कन कॉलेज माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि ३० एप्रिल २०२५ रोजी, डेक्कन कॉलेजमध्ये एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.



प्रा भांडारकर यांनी १८६१ मध्ये डेक्कन कॉलेजमधून बी ए पदवी आणि त्यानंतर १८६२ मध्ये एम ए पदवी पूर्ण केली. त्यानंतर १८८२ ते १८९३ या कालावधीत त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये ओरिएंटल स्टडीजचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.
या चर्चासत्रात भारतातील विविध भागांतील तसेच युरोप आणि अमेरिकेतील सुमारे २५ ज्येष्ठ अभ्यासकांनी सहभाग घेतला. प्रा भांडारकर यांच्या सर्वसमावेशक इंडॉलॉजी विद्याशाखेच्या दृष्टिकोनानुरूप, सहभागी अभ्यासकांनी संस्कृत व शब्दकोशशास्त्र, भाषाशास्त्र, इतिहास, आणि पुरातत्त्वशास्त्र या विषयांमध्ये सादरीकरण केले. हे सर्व सादरीकरण म्हणजेच हस्तलिखित संकलन, संस्कृत व्याकरण व ग्रंथ, शब्दकोशशास्त्र, इतिहास, पुरातत्त्व, व धर्मशास्त्र यामध्ये भांडारकरांनी केलेल्या अग्रगण्य आणि बहुआयामी योगदानाचे स्पष्ट प्रतिबिंब होते.
कार्यक्रमाची सुरुवात डेक्कन कॉलेजचे प्रभारी कुलगुरु प्रा प्रसाद जोशी यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनालयाचे माजी संचालक आणि जे जे स्कूल ऑफ आर्ट्स, आर्किटेक्चर आणि डिझाईनचे कुलपती डॉ ए पी जामखेडकर यांनी चर्चासत्राचे उद्घाटन केले आणि १९व्या शतकात महाराष्ट्रात आलेल्या नवचैतन्य लाटेमध्ये भांडारकरांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचा उल्लेख केला.
माजी संचालक आणि माजी प्राध्यापक प्रा के पद्दय्या यांनी प्रा भांडारकर यांच्या डेक्कन कॉलेजशी असलेल्या विद्यार्थी आणि प्राध्यापक या दोन्ही नात्यांमधील घनिष्ठ संबंधाचे स्मरण केले. त्यांनी नमूद केले की डेक्कन कॉलेजमध्ये कार्यरत असताना प्रा भांडारकरांनी डेक्कनचा पहिला इतिहास लिहिला, सर्व इंडॉलॉजी विद्याशाखेच्या अभ्यासांकरिता लागू शकणारी चिकित्सक संशोधन पद्धती विकसित केली, प्राचीन हस्तलिखितांचे मोठ्या प्रमाणावर संकलन केले आणि उच्च शिक्षणाचे तत्त्वज्ञान मांडले. प्रा पद्दय्या यांनी सांगितले की या चर्चासत्राचा हेतू केवळ भांडारकरांच्या कार्याचे स्मरण करणे नव्हे तर त्यांच्या विविध योगदानातून शिकणे आणि त्यांनी आयुष्यभर सामाजिक-धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे अनुकरण करणे हा देखील होता.
प्रा माधव देशपांडे (मिशिगन विद्यापीठ), प्रा क्रिस्टोफर एफ एडहोल्म (स्टॉकहोम विद्यापीठ), प्रा आर महालक्ष्मी, प्रा कुमकुम रॉय (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली), प्रा के एम श्रीमाली (दिल्ली विद्यापीठ), प्रा राधावल्लभ त्रिपाठी (राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, दिल्ली), प्रा देबर्चना सरकार (जाधवपूर विद्यापीठ), प्रा सी राजेन्द्रन, प्रा एन के सुंदरेश्वरन (कालीकत विद्यापीठ), प्रा अवनीश पाटील (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), प्रा पंचानन मोहंती, प्रा अलोका पराशर सेन (हैदराबाद विद्यापीठ), प्रा उमा वैद्य (मुंबई विद्यापीठ), आणि प्रा दिलीप जोग (प्रार्थना समाज, पुणे) हे चर्चासत्रातील प्रमुख वक्ते होते.
या चर्चासत्रात तीन स्वतंत्र सत्रे झाली
सत्र १ हे भांडारकरांच्या एकंदर कार्याचा आढावा घेणारे हे सत्र होते. प्रा देशपांडे, प्रा वैद्य आणि प्रा श्रीमाली यांनी त्यांच्या बहुआयामी इंडॉलॉजी विद्याशाखेच्या कार्यावर विचार मांडला. प्रा पाटील आणि प्रा जोग यांनी अनुक्रमे सामाजिक व धार्मिक सुधारणा विषयावर भाष्य केले.
सत्र २ हे संस्कृत व शब्दकोशशास्त्र यांसाठी समर्पित होते. प्रा त्रिपाठी, राजेन्द्रन, सुंदरेश्वरन, वैद्य, मोहंती, सरकार, आणि प्रा जयश्री साठे, प्रसाद जोशी, सोनल कुलकर्णी-जोशी व डॉ शिल्पा सुमंत यांनी विविध विषयांवर सादरीकरण केले. या सत्रात भांडारकरांचे ‘विल्सन भाषाशास्त्रीय व्याख्याने’, नाट्यशास्त्राचे वैदिक आधार, महाभारतातील सुलभा-जन्मक संवाद, संस्कृत अंकसंकेत, संस्कृत व्याकरण पुस्तिका, मार्टिन हॉगच्या ‘ऐतरेय ब्राह्मण’वरील समीक्षण, आणि मराठी उपभाषा व त्यांच्या सामाजिक-ऐतिहासिक पैलूंवर चर्चा झाली.
सत्र ३ हे इतिहास, पुरातत्त्व आणि सामाजिक-धार्मिक पैलूंवर केंद्रित होते. या सत्रात प्रा महालक्ष्मी, प्रा अलोका पराशर सेन, प्रा कुमकुम रॉय, प्रा शाहिदा अन्सारी, डॉ जामखेडकर, डॉ एडहोल्म, डॉ रेश्मा सावंत, डॉ गुरुदास शेटे, डॉ शिवनागी रेड्डी, डॉ अभिजीत दांडेकर, डॉ श्रीनंद बापट आणि डॉ अमृता नातू यांनी सहभाग घेतला. या सत्रातील विषयांमध्ये भांडारकरांचे ऐतिहासिक दृष्टिकोन, १९१३ च्या त्यांच्या धर्मविषयक ग्रंथानंतर धर्मशास्त्रातील घडामोडी, रुद्र संकल्पना व शैव संप्रदायाचा उदय, शिलालेख अभ्यास, डेक्कनमधील बौद्ध वास्तुंचे पुरातत्त्वीय संशोधन आणि हस्तलिखित संकलनाचा विस्तृत अभ्यास समाविष्ट होता.
चर्चासत्राचा समारोप प्रा के पद्दय्या यांच्या व्यापक आणि समीक्षात्मक भाषणाने झाला, ज्यात त्यांनी भांडारकरांच्या सर्वसमावेशक संशोधन पद्धती, शैक्षणिक आदर्शवाद, सार्वत्रिक मानवतावाद आणि आध्यात्मिक तत्त्वज्ञानावर भर दिला. डॉ शिल्पा सुमंत, डॉ राहुल म्हैसकर व डॉ सतीश नाईक यांनी समन्वयक म्हणून कार्य पाहिले. प्रा पी डी साबळे यांनी आभार प्रदर्शन केले.