राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिकार दिवस
विविधतेत घ्यावा एकतेचा शोध – माजिद पारेख
नागपूर : भारतासारख्या विभिन्न संस्कृती विभिन्न धर्म असलेल्या देशात आपण राहत असून विभिन्नतेत एकतेचा शोध घ्यावा, असे प्रतिपादन पारेख ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक श्री माजिद पारेख यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिकार दिवस बुधवार, दिनांक १८ डिसेंबर २०२४ रोजी पार पडला. दीक्षांत सभागृहात आयोजित कार्यक्रमात पारेख मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे यांनी भूषविले. अतिथी वक्ते म्हणून पारेख ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक श्री. माजिद पारेख, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांची यावेळी उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिकार दिवसाबाबत माहिती देताना श्री. माजिद पारेख यांनी सर्वांना समान अधिकार मिळावे म्हणून आपली जबाबदारी अधिक असल्याचे सांगितले. विचारांची सर्व द्वारे खुली ठेवली तर चांगले विचार येतील. समाजात वैचारिक विकास करण्यासाठी सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज असल्याचे पारेख म्हणाले. मानवी मूल्यांना आपण विसरतो, तेव्हा भेदभाव निर्माण होतो. मनुष्य म्हणून सर्वांना समान अधिकार असणे आवश्यक आहे. मनुष्य मनुष्यात कोणताच भेदभाव नको आहे. प्रत्येक धर्म बंधुभावाची शिकवण तसेच ‘वसुधैव कुटुंब’ म्हणजेच संपूर्ण जग माझे कुटुंब असल्याचा संदेश देते. आपण देखील त्याच मोठ्या कुटुंबाचे सदस्य आहोत, असा प्रगल्भ विचार करणे गरजेचे आहे. स्वतःच्या कुटुंबासह ‘वसुधैव कुटुंबकम् ‘ या कुटुंबाबाबत देखील सजग राहावे लागेल, असे पारेख म्हणाले.
अध्यक्षीय भाषण करताना प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे यांनी एकता बंधुत्वच देशाला पुढे नेईल, असे सांगितले. सर्वच धर्मग्रंथांनी चुकीच्या नव्हे तर चांगल्या मार्गाने जाण्याचा रस्ता दाखविला आहे. येणारी भावी पिढी, भावी समाज कसा असावा. त्यांच्यामध्ये बंधूभाव निर्माण व्हावा, याकरिता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बऱ्याच तरतुदी करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. आपण एकमेकांचे पूरक असून सर्व सोबत राहिले तरच चांगले होईल, असे देखील ते म्हणाले. प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिकार दिवस कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. आपली प्रतिज्ञा, राष्ट्रगीत बंधुभाव निर्माण करण्याचा विचार देत असून यामध्ये जागरूकता आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार सांस्कृतिक समन्वयक श्री. प्रकाश शुक्ला यांनी मानले. कार्यक्रमाला विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.