देवगिरी महाविद्यालयात एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय संशोधन कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालय, राज्यशास्त्र विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आयोजित, एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय संशोधन कार्याशाळेचे आयोजन दि.१ मार्च २०२४ रोजी करण्यात आले होते. यामध्ये “संशोधन विश्वातील विविध पैलूंचे दिशादर्शन: एक सखोल मार्गदर्शन” या शीषर्काखाली विविध पैलूंवर विविध तज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. प्रा. गिरीश जोशी, इंजिनीअरिंग फिजिक्स, रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई, मराठवाडा विभाग, जालना यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक तेजनकर होते. उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, डॉ. अपर्णा तावरे, कार्यशाळेचे संयोजक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. श्याम कदम या प्रसंगी उपस्थित होते.
दिपप्रज्वलनानंतर संयोजक प्रा. डॉ. श्याम कदम यांनी प्रास्ताविक करत असताना संशोधनासाठी योग्य मार्गदर्शन मिळायला हवे यासाठी संबंधित विषय आवर्जून घेण्यात आले आहेत. मार्गदर्शनाशिवाय संशोधन दिशाहीन होत असते, असे सांगितले.
उद्घाटक प्रा. गिरीश जोशी यांनी सामाजिक शास्त्रातील संशोधकांसाठी विविध क्लुप्त्या संशोधकांना सांगितल्या. नैसर्गिक शास्त्रातील संशोधन असो की सामाजिक शास्त्रातील संशोधन यामध्ये फारसा फरक नाही. संशोधन हे तटस्थपणे झाले पाहिजे. समाजात अनेक समस्या असतात या समस्यांवर सखोल संशोधन करता येऊ शकते, असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप करत असताना महाविद्यालायाचे प्राचार्य अशोक तेजनकर यांनी संशोधकांच्या शब्दाला किंमत असते त्याने केलेले संशोधन समाजोपयोगी असले पाहिजे. यासाठी नवनवीन समस्यांवर संशोधन करावे असे म्हणाले. दुसऱ्या सत्रात प्रा. शरद शेळके यांनी “संशोधनातील मुलभूत संकल्पना आणि संशोधन पद्धती” या विषयी सखोल मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथपाल प्रा. डॉ. धर्मराज वीर यांनी “संशोधनातील वांड:मय चोर्य” विषयी महत्वपूर्ण माहिती दिली.
चौथ्या सत्रात डॉ. संग्राम गुंजाळ यांनी “क्षेत्र अध्ययना विषयीचे तंत्र” सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांनी “संशोधनातील सांखिकीय तंत्राचा वापर” कसा करायचा या विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अंतिम व समारोपीय सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. शुजा शाकीर यांनी “सामाजिक शास्त्रातील परीमानात्मक संशोधन पद्धतीचा वापर” या विषयी सखोल व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करत असताना सद्य परिस्थितीतील राजकीय परीस्थितीवर संशोधनात्मक भाष्य केले.
या कार्यशाळेसाठी ३०० पेक्षा अधिक संशोधक व मार्गदर्शकांनी सहभाग घेतला. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्याम कदम, प्रा. गोविंद खाडप, प्रा. वर्षा कोरडे, डॉ. दीपक बाहीर, डॉ. गौतम गायकवाड, प्रा. सौरभ गिरी तसेच संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी यांनी मेहनत घेतली.