श्री बंकट स्वामी महाविद्यालयाच्या निवासी शिबिरात बौद्धिक सत्र संपन्न
युवकांनी सामाजिक नैतिकतेची जाण ठेवावी – राजू वंजारे
बीड : श्री बंकट स्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी शिबिर श्री क्षेत्र कपिलधार येथे दुपारच्या बौद्धिक सत्रामध्ये बीड येथील “जिव्हाळा शहरी बेघर निवारा” केंद्राचे सामाजिक कार्यकर्ते राजू वंजारे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उर्दू विभागाचे विभाग प्रमुख डॉ असिफ सय्यद तर व्यासपीठावर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ शंकर शिवशेट्टे प्रा. राजाभाऊ नागरगोजे उपस्थित होते. प्रमुख वक्ते राजू वंजारे यांनी बीड येथील जिव्हाळा शहरी बेगर निवारा केंद्र विषयी स्वयंसेवकांना माहिती दिली. ते म्हणाले की आज भारतीय संस्कृती ही जगात सर्वोच्च असली तरी आपल्याकडे अनाथ तसेच परिवार असून देखील आपल्याच माणसांना रस्त्यावर सोडणे ही समस्या निर्माण झालेली आहे. काही कारणास्तव निसर्गाकडून म्हणा किंवा ईश्वराकडून म्हणा काही व्यक्तींना जन्मताच अपंगत्व येते तसेच मानसिक आजार असतात बौद्धिक विकास नसणे अशा अनेक कारणांनी आपल्याच समाजातील काही व्यक्ती रस्त्याच्या कडेला भीक मागताना दिसतात माणूस असून देखील माणसासारखे वर्तन न करणे, एखाद्या पशुतुल्य जीवन जगणाऱ्या आपल्या समाजातील व्यक्तीला आपण दुर्लक्षित करतो. अशा बेघर, मानसिक आजार असलेले तसेच वेगवेगळ्या कारणाने मानवी चुकांच्या परिणामामुळे काही व्यक्तींना कौटुंबिक सामाजिक त्रासामुळे बेघर होण्याची वेळ येते.आज आपण पाहत आहोत एकीकडे आपण खूप प्रगती केली दुसरीकडे मात्र आपल्या आजूबाजूला अशा समस्या पाहिल्यावर वाटते की माणूस माणसाचा दुश्मन होत चालला आहे.

माणूसच दुसऱ्यावर अत्याचार करतो अशा वेगवेगळ्या कारणांमधून बळी पडलेल्या दुःखीत व आपल्याच लोकांकडून फसवणूक झालेल्या तसेच वेगवेगळ्या आजाराने त्रस्त अशा लोकांची सेवा करण्याचे काम या जिव्हाळा शहरी निवारा केंद्र द्वारे करण्याचे काम सुरू आहे. जिव्हाळा शहरी बेघर निवारा केंद्रामध्ये आज देखील 40 ते 45 व्यक्ती निवारा घेत आहेत. त्यांची भोजनाची व्यवस्था, त्यांचे आरोग्य व्यवस्था, स्वच्छता या सर्व गोष्टींची नियोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते राजू वाघमारे व त्यांचे सहकारी करीत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी होणारे लग्न समारंभ या ठिकाणी शिल्लक राहिलेले अन्न तसेच शहरातील ठराविक ठिकाणी असणाऱ्या हॉटेल्स या ठिकाणी मिळणारे अन्न हे तपासणी करून सकस आहे की नाही तसेच खाणे योग्य आहे का या गोष्टी पाहिल्यानंतरच त्या ठिकाणी असणाऱ्या सदस्यांना दिले जाते. रस्त्याच्या कडेला भिकारी असतील वेड्या व्यक्ती असतील अशा व्यक्तींचे दाढी कटिंग करणे त्यांना माणसात आणणे माणसासारखे जगायला शिकवणे तसेच त्यांच्याकडे असणारी स्किल व त्याचे प्रशिक्षण देणे त्यातूनच त्यांच्या उदरनिर्वासाठी व्यवसाय टाकून देणे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाला चालना देणे असे सामाजिक काम या जिव्हाळा बेघर निवारा केंद्राच्या माध्यमातून चालू आहे. आज देखील बस स्टॉप बाजार अशा ठिकाणी असणारे बेघर ज्यांची कोणीही काळजी घेत नाही अशा व्यक्तींची काळजी घेण्याचे काम या ठिकाणी करण्यात येते. खऱ्या अर्थाने मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी कार्य केले जात आहे.आजच्या तरुणांनी आपल्या समाजामध्ये समाजाप्रती आत्मीयता बाळगणे आवश्यक आहे.
आपल्या भारताचा प्राचीन इतिहास पाहता आपली संस्कृती सर्वांना सामावून घेणारी होती आणि अनेकांना आपण आधार देत होतो परंतु आज चंगळवादामुळे आजच्या युवकांपुढे आदर्श नसल्यामुळे फक्त मी आणि माझं या वृत्तीमुळे जन्मदाते आई-वडील भाऊ-बहीण यांच्याविषयी आत्मीयता नसणे हे वृत्ती निर्माण झाली आहे. तरी आजच्या कालखंडामध्ये भारतीय संस्कृती ही नैतिक मूल्यांची जपणूक करणारी संस्कृती म्हणून बघितले जाते तरीदेखील आपण सर्वांनी या संस्कृतीचे जतन संवर्धन व्हावं आपली गुरुकुल शिक्षण पद्धती चांगली होती त्याकाळी गुरु व आई-वडिलांविषयी आत्मीयता व सर्वोच्च स्थान मनामध्ये होते.म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी अशा आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या परिस्थितीवर काम करण्याची गरज आहे. या जिव्हाळा बेघर निवास केंद्राच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन वृक्ष लागवड हागणदारी मुक्त गाव तसेच नदीचे खोलीकरण व रुंदीकरण अशा विविध कार्याच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम तसेच समाजसेवेविषयी कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम तसेच समुपदेशन केंद्र या माध्यमातून चालवले जात असल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आसिफ सय्यद यांनी केले “धूप से निकलो घटावो मे| नहाकर देखो जिंदगी क्या है| जिंदगी क्या है किताबोसे सर को हटाके देखो|
या दृष्टिकोनातून जीवनाकडे बघण्याची दृष्टी अगदी सकारात्मक असावी आजच्या तरुणांना समाजसेवे विषयी सकारात्मक विचार करायला लावणे तसेच विविध सामाजिक चळवळी विषयी माहिती व्हावी या दृष्टिकोनातून आज आम्ही एक समाजसेवक आपल्यासमोर घेऊन आलोत त्यांच्या कार्याची माहिती समाजामध्ये व्हावी हा उद्देश ठेवून आपण राजू वंजारे यांना आमंत्रित केले आणि त्यांच्या कार्यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात का होईना मदत करावी या कार्यासाठी कोणत्याही प्रकारची शासकीय मदत नाही म्हणून आपण आपला वाढदिवस निमित्त अशा ठिकाणी अन्नदान करू शकतो व यांच्या कार्यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात सहभाग नोंदवू शकतो असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेवक आर्यन आतकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा रणजीत आखाडे यांनी मानले याप्रसंगी स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.