ब्रह्माकुमारीज् च्या कार्यातून मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी प्रेरणा – कुलसचिव डॉ. विनोद पाटील
माऊंट आबू दर्शनावरील विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न
जळगाव : जागतिक शांती आणि सद्भावनेसाठी ब्रह्माकुमारीज् संस्थेचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या मूल्यशिक्षणाच्या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडल्याचे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी केले. ते ढाके कॉलनी येथील ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्रात आयोजित शिवसंदेश युगपरिवर्तन कालदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.डॉ. पाटील यांनी ब्रह्माकुमारीज् विश्व विद्यालयाच्या राजयोगाद्वारे साधकांमध्ये होत असलेल्या जीवनपरिवर्तनाचा उल्लेख केला. ते म्हणाले, “राजयोगामुळे साधकांची उक्ती आणि कृती समान होत असल्याने त्यांच्या जीवनाची दशा आणि दिशा सकारात्मक होते.” युजीसीच्या नवीन शैक्षणिक धोरणात मूल्यशिक्षणाचा समावेश असल्याने ब्रह्माकुमारीज् राबवत असलेल्या अभ्यासक्रमांचे देशातील नाशिक, मदुराई, मणीपूरसारख्या नामांकित विद्यापीठांत अंमलबजावणी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

संस्कारक्षम कार्यक्रम निर्मितीत योगदान
आकाशवाणी जळगाव केंद्राचे केंद्र संचालक ज्ञानेश्वर बोबडे यांनी सांगितले की, आकाशवाणीच्या माध्यमातून संस्कारक्षम व मूल्यनिष्ठ कार्यक्रम प्रसारित करण्यात ब्रह्माकुमारीज् संस्थेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी माऊंट आबूहून आलेल्या प्रमुख वक्त्यांच्या मुलाखती आणि भाषणांमुळे प्रबोधन अधिक प्रभावी झाल्याची भावना व्यक्त केली.
दिनदर्शिकेचे प्रकाशन व वैशिष्ट्ये
सन 2025 च्या विशेष माऊंट आबू दर्शन कालदर्शिकेचे प्रकाशन डॉ. विनोद पाटील, ज्ञानेश्वर बोबडे, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, मधुकर सोनार, धीरज सोनी, डॉ. सोमनाथ वडनेरे, ब्रह्माकुमारी हेमलतादीदी, ब्रह्माकुमारी वैशाली, आणि ब्रह्माकुमारी तेजलदीदी यांच्या हस्ते संपन्न झाले.

ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले की, “या दिनदर्शिकेत माऊंट आबूच्या वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांची सचित्र माहिती आहे, जी जागतिक पर्यटन आणि आध्यात्मिक उर्जेसाठी मार्गदर्शक ठरेल.”
प्रसंगी ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांनी दिनदर्शिकेद्वारे मानवसेवा आणि आध्यात्मिक प्रेरणा वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार ब्रह्माकुमारी हेमलतादीदी यांनी मानले.
हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला, ज्याने मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीचे ध्येय अधिक दृढ केले.