संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाकडून जेंडर ऑडीटसाठी पुढाकार
अमरावती : साधारणत: आर्थिक बाबींचे ऑडीट करण्यावर विशेष लक्ष देण्यात येते. त्यातुलनेत इतर बाबींचे ऑडीट करण्यावर फारसे लक्ष देण्यात येत नाही. अलीकडे मात्र संस्थात्मक पातळीवर विविध घटकांचे ऑडीट करण्यावर देखील भर देण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही संस्थेचे जेंडर ऑडीट करणे अतिशय महत्त्वाचे असते. सदर बाब लक्षात घेऊन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरद्वारे जेंडर ऑडीट तयार करण्यात आले आहे.
या अंतर्गत सध्या पहिल्या पातळीवर शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील विद्यापीठ परिसरातील माहिती संकलित करण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यापीठातील विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवर्गनिहाय प्रवेश, विद्यार्थ्यांचा खेळांमधील आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभाग तसेच ‘कमवा आणि शिका’ या योजनेतील विद्यार्थ्यांचा सहभाग या संदर्भातील माहिती संकलित करण्यात आली. सोबतच विद्यापीठातील एकूण शिक्षक, शिक्षकेत्तर, अंशदायी शिक्षक यांच्या प्रमाणाची माहिती गोळा करण्यात आली. या सर्व माहितीच्या आधारे लिंगभाव दृष्टीकोनातून माहितीचे विश्लेषण करण्यात आले.
यामधून स्त्री-पुरुषांच्या प्रमाणाच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला. त्यामुळे प्राथमिक पातळीवर असे आढळून आले की, विद्यापीठातील शैक्षणिक अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण अधिक आहे. मात्र अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशात एसटी आणि व्हीजेएनटी प्रवर्गात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. अभ्यासक्रमांच्या द्वितीय वर्षाच्या प्रवेशात एसटी आणि एसबीसी प्रवर्गात मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे. खेळांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण कमी आहे तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण जास्त आहे. ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक आहे. विद्यापीठातील शिक्षकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. अंशदायी शिक्षकांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे, तर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अत्याधिक असून स्त्रियांचे प्रमाण अतिशय अत्यल्प आढळून आले आहे.
अहवालात विद्यापीठ परिसरात उपलब्ध असणाऱ्या काही सेवा सुविधांचा तसेच भौतिक पर्यावरणाचा, अँटी रॅगिंग कमिटी आणि अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती इत्यादींचाही अभ्यास समाविष्ट आहे. या अभ्यासामध्ये आवश्यक भाग वाढविण्यात येणार असून त्याच्या आधारे विद्यापीठाशी संलग्नित असणाऱ्या महाविद्यालयांमधील जेंडर ऑडीटच्या दृष्टीने आवश्यक माहितीचे संकलन पुढील टप्प्यात करण्यात येणार आहे. यासाठी कुलगुरू यांच्या मार्गदर्शनात पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे. जेंडर सेन्सिटायझेशन आणि जेंडर इक्वालिटी या दृष्टीकोनातून जेंडर ऑडीट महत्त्वाचे ठरणार आहे. कुलगुरूंनी डॉ वैशाली गुडधे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या उपक्रमाबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.