शिवाजी विद्यापीठात माहितीपर कार्यक्रम संपन्न
जगावरील महायुध्दाचे विनाशकारी संकट टाळणे आवश्यक – डॉ राजन पडवळ
कोल्हापूर : मानवाच्या कल्याणासाठी जगावरील महायुध्दाचे विनाशकारी संकट टाळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या बैंक ऑफ इंडिया चेअरचे समन्वयक डॉ राजन पडळव यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि बैंक ऑफ इंडिया चेअर व गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये ‘हिरोशिमा दिन’ ‘हिरोशिमावरील बॉम्बस्फोट आणि त्यामागील इतिहास’ या विषयावर माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बैंक ऑफ इंडिया चेअर व गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक डॉ पडवळ बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के उपस्थित होते. प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ पडवळ पुढे म्हणाले, जपानच्या हिरोशिमावर ६ ऑगस्ट, १९४५ साली मानवजातीवर पहिला अणुबौंम्ब टाकण्याचा विनाशकारी प्रयोग केला गेला. त्यानंतर, तीन दिवसांनी ९ ऑगस्टला दुसरा अणुबॉम्ब नागासाकीवर टाकला आणि युरोपपासून सुरू झालेल्या महायुध्दाचा प्रवास जपान पर्यंत येवून थांबला. पहिले महायुध्द २८ जुलै, १९१४ ला सुरू झाले. आणि येथूनच म्हणजे पहिल्या महायुध्दामध्येच दुसऱ्या महायुध्दाची पाळेमुळे रोवली गेली. सव्वाचार वर्षे हे महायुध्द सुरू होते.
सैबेरीयन नागरिकाने ऑस्ट्रेयीन नागरिकाची बोसनियामध्ये हत्या केली. बोसनिया आणि सैबेरिया एकत्र येवून युगोस्लाव्हीया देश निर्माण व्हावे म्हणून बोसनिया हा प्रदेश सैबेरियन प्रदेशाचा भाग असला पाहिजे असे हत्या करण्याऱ्या सैबेरीयन नागरिकाचा उद्देश होता. सैबेरियाने या हत्येबाबत माफी मागावी असे ऑस्ट्रीयाचे म्हणणे होते. यास सैबेरियाने नकार दिल्यानंतर युध्दास सुरूवात झाली. रशिया हा सैबेरियाचा मित्र होता म्हणून रशियाने ऑस्ट्रीयावर हल्ला केला. फ्रान्स, ऑस्ट्रेया, जर्मनी यांचे नंतर ग्रेट ब्रिटनही या महायुध्दात सामील झाले.
जर्मनीने बेल्जीयमवर हल्ला केला आणि ग्रेट ब्रिटनने जर्मनीवर हल्ला केला. युध्दाचे केंद्र बिंदू जर्मनी होते. त्यावेळच्या साम्राज्यशाहीमुळे महायुध्दास सुरूवात झाली. पहिल्या महायुध्दामध्ये ब्रिटनच्या बाजूने भारताकडून दहा लाख लोक युध्द लढले आणि एक लाख वीस हजार लोक मृत्युमुखी पडले. प्रमुख राष्ट्रांकडून आपल्या अधिपत्याखाली असलेले प्रदेश या युध्दामध्ये ओढले गेले आणि पहिल्या महायुध्दामध्ये तीन कोटी सत्तर लाख लोख बाधित झाले. त्यापैकी एक लाख सत्तर हजार लोक मरण पावले.
पहिल्या महायुध्दा नंतर युरोपचा नकाशा बदलला आणि युगोस्लाव्हीया हा देश अस्तित्वात आला. पुढे तह होवून जर्मनीस फार मोठी किंमत मोजावी लागली. युध्दामुळे सन १९२० ते १९३० या काळात जर्मनीमध्ये फार मोठी बेरोजगारी निर्माण झाल्याने जर्मन नागरिकांमध्ये असंतोष पेटत होता. १९३३ मध्ये ॲडॉल्फ हिटलर पुढे आले. त्यांनी ज्यू लोकांचा मोठया प्रमाणावर नरसंहार केला. जर्मनीने १ सप्टेंबर, १९३९ रोजी पोलंड बरोबर युद्धास सुरूवात केली आणि याच ठिकाणी दुसऱ्या महायुध्दाला सुरूवात झाली.
अमेरिका पहिल्या महायुध्दापासून दुसऱ्या महायुध्दा पर्यंत सहभागी नव्हती. परंतु, दुसऱ्या महायुध्दामध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केला. ग्रेटर अशिया स्थापन करण्यासाठी जपानने 1931 साली नॉर्दर्न चायनावर हल्ला केला. जवळपासच्या सर्व बेटांवर जपानचे अधिराज्य गाजत होते. भारताचा प्रदेश काबीज करण्याचा जपानच्या राजाचा उद्देश होता. अमेरिकेने जपानवर काही निर्बंध घातली. जपानने पुढे मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलिपीन्सचा प्रदेश काबीज करून घेतला. तो पर्यंत अमेरिका युध्दात प्रत्यक्ष सामील झाली नव्हती.
जपानने ७ डिसेंबर, १९४१ साली अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या पर्ल हार्बर या बेटांवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी हवाई बेटांचा समूह आणि अमेरिकेच्या नौदलाचे तळ होते. शांततेचे बोलणे सुरू असल्यामुळे अमेरिका गाफील होती. याच दरम्यान सहा विमान वाहतूक करणाऱ्या मोठया नौकांवर ३५० विमाने लादून जपानने ७ डिसेंबरला पर्ल हर्बरवर हल्ला केला. १८३ विमाने सकाळी ०६:०५ वाजता आणि ०८:३० वाजता उर्वरित विमानांनी हल्ला केला.
या युध्दामध्ये अमेरिकेचे ॲरिओना या महाकाय युध्दनौकेसह २१ युध्द नौका हानीग्रस्त होवून बुडाले. पुढे अमेरिकेने टोकियोसह ६६ मुख्य शहरांवर हल्ला चढविला. मॅनहटन या ठिकाणी महाकाय ॲटोंबॉम्ब तयार करण्यास सुरूवात झाली. पहिल्या ॲटोंबॉम्बची चाचणी घेतल्यानंतरयाचा वापर केला जावू नये असे प्रत्येक शास्त्रांचे म्हणणे होते. यामध्ये प्रचंड प्रमाणात विध्वंसक शक्ती होती. ज्या बेटावर याची चाचणी झाली तो बेट नष्ट झाला. कुठल्याही परिस्थितीमध्ये जपानवर सुड उगविण्याची मानसिकता अमेरिकेची झालेली होती. त्यामधूनच हिरोशिमा आणि नागासाकीवर अनुक्रमे लिटल बॉय आणि फॅटमॅन या अजस्त्र अणुबॉम्बचा वापर केला गेला.
यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के म्हणाले, पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दामध्ये मोठया प्रमाणात सैनिकांबरोबरच सामान्य नागरिकांनाही याची झळ बसली. महायुध्दामध्ये बेचिराख झालेल्या जपानने आज फिनिक्स पक्षाप्रमाणे नवीन उभारी घेतलेली आहे.
याप्रसंगी पर्ल हर्बरवरील हल्ल्याची व हिरोशिमा आणि नागासाकीवरील हल्ल्याची संग्रहीत चित्रफीत दाखविण्यात आली.
यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ प्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ विलास शिंदे, आजीवन व अध्यासन केंद्राचे संचालक डॉ रामचंद्र पवार यांचेसह शिक्षक, प्रशासकीय सेवक, नागरिक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
_______