गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत ‘भारत-पाकिस्तान: सलोखा ह्या जन्मी?’ परिसंवाद संपन्न
पुणे : देशातील नामांकित गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेत ‘भारत-पाकिस्तान: सलोखा ह्या जन्मी?’ हा परिसंवाद पार पडला. स्वीडनमधील स्टॉकहोम विद्यापीठातील राजकीय शास्त्रज्ञ, लेखक आणि प्राध्यापक डॉ. इश्तियाक अहमद हे ह्या संवादाचे मुख्य वक्ते होते. कुलगुरू डॉ. अजित रानडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात डॉ. अजित रानडे यांनी महाभारत या महाकाव्यातील एक किस्सा सांगितला. अपरिहार्य संघर्ष होण्याआधी भगवान श्रीकृष्ण ह्यांनी शांततेसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांवर हा किस्सा आधारित होता. डॉ. रानडे यांनी शांततेच्या प्रयत्नात कोणतीही कसर न ठेवण्याच्या महत्त्वावर जोर दिला.
डॉ. इश्तियाक अहमद यांनी भारत-पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण संबंध, आव्हाने असूनही, आशावाद व्यक्त केला की भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करणे आपल्या आयुष्यात अशक्य नाही. डॉ. अहमद यांनी १९६० च्या सिंधू जल कराराचे सकारात्मक परिणाम परस्पर गुंतवणुकीद्वारे शांततेला संधी देण्याचे उदाहरण म्हणून दिले. त्यांच्या संशोधनानुसार दोन्ही बाजूचे लोक एकमेकांबद्दल द्वेष किंवा शत्रुत्व बाळगत नाहीत; उलट, त्यांना मनापासून मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत.
व्यावहारिकदृष्ट्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी, डॉ. अहमद यांनी प्रस्तावित केले की पाकिस्तान आणि भारत अधिकृत माध्यमांद्वारे संवाद साधू शकतात. गैरसमज दूर करण्यासाठी आणि लोकांची धारणा बदलण्यासाठी दोन्ही बाजूंच्या अभ्यासकांमध्ये पॅनेल चर्चा आयोजित करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. याशिवाय, डॉ. अहमद यांनी भारताच्या न्याय्य चिंतेकडे लक्ष वेधून दहशतवाद आणि अतिरेकाविरुद्ध निर्णायक पाउले उचलण्याचे आवाहन पाकिस्तानला केले. शेवटी, त्यांनी विभक्त कुटुंबे आणि मित्र यांच्यातील पुनर्मिलन सुलभ करण्यासाठी आणि आपापसातील संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी प्रवास निर्बंध कमी करण्याचे सुचवले.
संकल्प गुजर यांनी आयोजित केलेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्राने परिसंवादाचा समारोप झाला. डॉ. अहमद यांनी स्पष्टपणे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले व विविध दृष्टीकोनांमध्ये मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान केली.मागे वळून पाहताना, विविध दृष्टिकोन प्रभावीपणे मांडून आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामंजस्यपूर्ण भविष्यासाठी उपस्थितांना नवीन आशा देणारे ठरले.