एमजीएम विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
छत्रपती संभाजीनगर : भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन महात्मा गांधी मिशन एमजीएम स्टेडियम येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी एन्ड्रेस अँड हाऊसरचे व्यवस्थापकीय संचालक कैलास देसाई यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देसाई यांनी ध्वजारोहण झाल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना देसाई म्हणाले, समकालीन काळामध्ये गोष्टी बदलत असून प्रगतीची भविष्यकालीन दिशा आशियाकडे असणार असून यामध्ये प्रामुख्याने भारताकडे जगाचे लक्ष आहे. आपल्या देशाकडे प्रचंड क्षमता असून आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल आहे. भारतीय लोकशाही व्यवस्था जगातील सर्वात मोठी लोकशाही असून आपल्याकडील कायदेमंडळ, न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ या व्यवस्था चांगल्याप्रकारे कार्य करीत असल्याकारणाने बाहेरची लोकं इथे गुंतवणूक करू शकत आहेत.
एमजीएमने आज देशभर किंबहुना जगभर आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. पालक आपल्याला जन्म देतात मात्र, गुरू आपल्याला घडवत असतात. एमजीएम विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी दर्जात्मक शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायम सकारात्मक दृष्टिकोण आणि प्रमाणिकपणा जपत विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास करणे आवश्यक असल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नृत्य आविष्कार, वृंदगान, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित कार्यक्रम, प्रहसन आणि पथसंचलन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पथ संचलनातील उत्कृष्ट पथकाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी घाडगे, श्रीशा आपोनारायण, आर्यन डमाळे व हर्षिका दायमा या विद्यार्थ्यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमासाठी कुलपती अंकुशराव कदम, अनुराधाताई कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, सर्व अधिष्ठाता, संचालक, प्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, सर्व एमजीएम परिवार व सर्व संबंधित उपस्थित होते.