महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये आयोजित स्वातंत्र्य दिन कार्यक्रमामध्ये प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी कुलसाचिव डॉ राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी एन व्ही कळसकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ देवेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यापीठाचे प्रति-कुलगुरु डॉ मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी लढलेल्या हुतात्मांना अभिवादन करुन त्यांच्या कार्याची प्रेरणा आपण घ्यावी. विद्यापीठाचा जागतिक स्तरावर नावलौकिक होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमाअंतर्गत विद्यापीठ परिसरात जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी. या संकल्पनेतून आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात आपल्या पुढील पिढीसाठी नक्कीच सुखाची सावली देईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप राठोड यांनी केले. ‘एक पेड मॉं के नाम’ उपक्रमाचे समन्वयन उपकुलसचिव व विद्यापीठ हरित कक्षाचे प्रमुख डॉ सुनिल फुगारे यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.