उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “उत्कर्ष” राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव : मतदान जनजाागृती, महिला सबलीकरण, बाल विवाह, वारकरी संप्रदाय, महाराष्ट्राची लोक संस्कृती, महाराष्ट्राचे लोकसाहित्य व लोक परंपरा, समतेची वारी, प्लॅस्टीक निर्मूलन, आदिवासी संस्कृती, स्वच्छता व पर्यावरण संरक्षण विषयावर प्रकाश टाकणारे आणि विविध वेशभुषाद्वारे राज्यस्तरीय उत्कर्ष स्पर्धेच्या शोभायात्रेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पहिल्या दिवशी उत्साह भरला. या शोभायात्रेत १५ विद्यापीठांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि राष्ट्रीय सेवा योजना कक्ष उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उत्कर्ष” या राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन समारंभापूर्वी विद्यापीठाच्या मुख्यप्रवेशद्वारापासून प्रशासकीय इमारतीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेस कुलगुरु प्रा व्ही एल माहेश्वरी व सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
यावेळी प्र-कुलगुरु प्रा एस टी इंगळे, राज्यसंपर्क व रासेयो कक्षाचे प्रतिनिधी अनिल केनगर, व्य प सदस्य, प्रा सुरेखा पालवे, डॉ पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ विनोद पाटील, अधिसभा सदस्य स्वप्नाली काळे, भानुदास येवलेकर, डॉ जयेंद्र लेकुरवाळे तसेच रासेयो संचालक डॉ सचिन नांद्रे उपस्थित होते.
शोभायात्रेच्या अग्रभागी यजमान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ सहभागी होता. ढोल-ताशा, संबळ व आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात विद्यार्थी घोषणा देऊन या महोत्सवाचा आनंद घेत होते. याशिवाय पारंपरिक वेशभुषेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी काहींनी बहिणाबाई, सावित्रीबाई, अहिल्यादेवी, बिरसा मुंडा, बाबा आमटे, ग्राम देवी, वारकरी अशा वेशभूषा परिधान करुन शोभा यात्रेत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जनजागृतीचा संदेश दिला. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांनी समतेची वारीची वेशभूषा साकारुन समानतेचा संदेश पोहचविला. भारती अभिमत विद्यापीठ, पुणेच्या विद्यार्थ्यांनी महिला सबलीकरणचा संदेश देतांना विद्यार्थिनींनी सावित्रीबाई, अहिल्यादेवी अशा विविध वेशभूषा परीधान करीत घोषणा दिल्या.
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवतांना विविध ग्रामदेवी व बाबा आमटे यांच्या वेशभूषेतून त्यांचे कार्य समोर आणले. संत गाडगेबाबा अमरावती नारी शक्ती व जनजागृतीचा संदेश दिला तसेच हातात झाडू घेऊन एक विद्यार्थिनी स्वच्छतेचे महत्व सांगत होती. अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापुर व स्वामी रामानंदतिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या विद्यार्थ्यांनी यांनी वारकरींचा वेशभूषा परिधान करुन वारीचा प्रसंग मांडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अनेकतेतून एकतेचा संदेश दिला. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी बाल विवाह पध्दती बंद करण्याचा संदेश देत जन जागृती केली. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा संदेश देत प्लॅस्टीक मुक्ती चा संदेश देत स्वच्छ भारत अभियानाचे सादरीकरण केले आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील लोक साहित्य व लोक परंपरेची व कान्हबाई उत्सवाची मांडणी केली. विद्यार्थ्यांनी बहिणाबाई, बिरसा मुंडा, आदींच्या वेशभूषा व पारंपरिक वाद्यांचा गजर केला.
याप्रसंगी उत्कर्ष समन्वयक विजय पाटील, डॉ दिनेश पाटील, प्रा जे एन नेहेते, प्रा अनिल बारी, प्रा राजू गवारे, प्रा विश्वास भामरे, प्रा अमोल भुयार, प्रा मनोहर पाटील, प्रा दिलीप पाटील, कक्ष अधिकारी शरद पाटील, कैलास औटी व शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.