श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम कार्यशाळेचे उदघाटन

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी सकारात्मकता आवश्यक – डॉ डी डी पवार

परभणी : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे होऊ घातलेल्या जागतिक बदलाच्या अनुषंगाने तयार केले आहे. महाविद्यालय स्तरावर हे राबविताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे महत्वाचे घटक आहेत. धोरण यशस्वी राबविण्यासाठी या तिन्हीही घटकांची सकारात्मकता आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणित संकुलाचे संचालक डॉ डी डी पवार यांनी बुधवारी (दि ३०) रोजी परभणी येथे केले.

श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजित विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रम कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा गणित, प्राणिशास्त्र आणि मत्स्यशास्त्र या विषयांच्या प्राध्यापकांसाठी आयोजित केली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव उपस्थित होते. प्रमुख उपस्थितीत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य इंजि नारायण चौधरी, गणित अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ महेश वावरे, उपप्राचार्य डॉ श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ रोहिदास नितोंडे, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ उत्कर्ष किट्टेकर, मत्स्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ एस डी अहिरराव, प्राणिशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ एच एस जगताप, संयोजक डॉ जयप्रकाश गायकवाड, प्रा शरद कदम, डॉ सचिन येवले, डॉ चारुदत्त बेले आदी उपस्थित होते.

Advertisement

उपस्थित प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना डॉ पवार म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये संभ्रम होता. त्यासाठी विद्यापीठाने कार्यशाळांचे आयोजन करून हा संभ्रम दूर करण्याचे काम केले आहे. हे धोरण यशस्वी राबविण्यासाठी प्राध्यापकांची महत्त्वाची भूमिका आहे. सदरील कार्यशाळेच्या माध्यमातून अभ्यासक्रमात असलेल्या उणिवा दूर करून त्या भरून काढण्याचे काम अभ्यास मंडळ करेल असे प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या मनोगतात इंजि. नारायण चौधरी म्हणाले, महाराष्ट्रात आपल्या विद्यापीठाची गुणवत्तापूर्ण विद्यापीठ म्हणून ओळख आहे. काळानुरूप आपल्यात बदल घडवून आणले पाहिजेत. येणारा काळ आव्हानांचा आहे. अशावेळी प्राध्यापकांनी बहुशाखीय ज्ञान प्राप्त करून बहुआयामी व्हावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे एक संधी आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी या संधीचे सोने करावे. अभ्यास मंडळांनी अभ्यासक्रम तयार करीत असताना रोजगाराभिमुख तयार करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतील असे आवाहन यावेळी केले. सदरील कार्यशाळेत डॉ पी पी जोशी, डॉ के एन कदम, डॉ जी डी गोरे आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी लातूर, हिंगोली, नांदेड तसेच परभणी जिल्ह्यातील गणित, प्राणिशास्त्र तसेच मत्स्यशास्त्र या विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ उत्कर्ष किट्टेकर, सूत्रसंचालन डॉ तुकाराम फिसफिसे तर आभार डॉ एच एस जगताप यांनी केले. प्रा अभिजित भंडारे, सुरेश पेदापल्ली, सय्यद सादिक, साहेबराव येलेवाड, मारोती दंडेवाड, दिलीप निर्वळ, जगन्नाथ रोडगे, एस जी पोलावार, कृष्णा तांदळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page