उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा कार्यशाळेचे उदघाटन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळा आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त आदिवासी विद्यार्थी आत्मविश्वास व प्रेरणा कार्यशाळेला प्रारंभ झाला असून दि.१६ मार्चपर्यंत कार्यशाळा होणार आहे.
कार्यशाळेचे उदघाटन कुलसचिव डॉ विनोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी अरुण पवार, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळ, प्रशाळेच्या संचालिका डॉ. मनिषा इंदाणी, समन्वयक डॉ. संतोष खिराडे उपस्थित होते. कार्यशाळेत जळगाव धुळे नंदुरबार आणि विदयापीठ प्रशाळातील विदयार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कुलसचिवांनी आदिवासी विदयार्थ्यांसाठी विदयापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनाचा आढावा घेतला.
नंदुरबार मध्ये विदयापीठाची अॅकडमी स्थापन होत असून लवकर विविध अभ्यासक्रम सुरू होत असून आदिवासी भागातील विदयार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षेकरीता विदयापीठ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. अरुण पवार यांनी आदिवासी विद्यार्थी हिताच्या योजना आणि अमंलबजावणी या विषयावर आदिवासी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्रात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास व प्रेरणेची नेमकी गरज का असते या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजित करण्यामागील विद्यार्थी विकास विभागाची भूमिका विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी मांडली.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात भारतातील आदिवासी नायक या विषयावर डॉ. विशाल पराते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन आणि आभार डॉ. रणजित पारधे यांनी व्यक्त केले.