डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ४९ वा नाट्य महोत्सवाचे उदघाटन
सांस्कृतिक आरोग्य जपण्याची कलाकारांची जबाबदारी – अभिनेते मिलिंद शिंदे यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : सामाजिक, सांस्कृतिक आरोग्य जपणे ही कलाकारांची जवाबदारी असते. कलावंत जिथे असतात तिथे दंगल होऊच कशी शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.



डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर कला सादरीकरण विभागाचा ४९ वा नाट्य महोत्सव उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी विकास मंडळ संचालक डॉ कैलास अंभुरे होते. विभागप्रमुख डॉ वैशाली बोधेले यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, नाट्यशास्त्र विभाग नाट्य महोत्सव सातत्याने आयोजित करत आहे ही विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी मोठी बाब आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांनी सकारात्मकता ठेवून घ्यायला हवा.
ही त्यांनी उपस्थित केला व सामान्य लोकांपेक्षाही जास्त जबाबदारी कलावंतांची असते असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ कैलास अंभुरे यांनी सध्याच्या काळात तंत्रज्ञान अर्थात एआयचा विस्फोट हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे. कला म्हटले की निष्ठेने वाहून घेणे गरजेचे आहे. मात्र सध्याच्या काळात निष्ठा, समर्पणवृत्तीचा अभाव आहे.
नाट्यविभागाला गतवैभव प्राप्त करण्यासाठी सर्वांनी निष्ठेने कार्य करावे लागेल. विद्यापीठात आंबेडकरी जलसा हा नव्याने अभ्यासक्रम सुरु होत असून लोककला व सांस्कृतिक अभ्यास या संदर्भात अध्ययन अध्यापनाचे काम होणार आहे, असेही डॉ अंभुरे यांनी सांगतिले. सध्या कुलगुरू डॉ विजय फुलारी हे पीएम उषा आणि अन्य योजनांच्या माध्यमातून कला सादरीकरण विभागाला गतवैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले. प्रास्तविकात वैशाली बोदेले यांनी विभागाची ५० वर्षांची वाटचाल व नाट्य, सिनेमा, टी व्ही क्षेत्रातील योगदान यावर भाष्य केले.
यावेळी सर्व नवोदित दिग्दर्शकांचे तसेच नाट्य महोत्सवाचे परीक्षक डॉ किशोर शिरसाठ, पिफ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सांगळा’ चित्रपटाला यश मिळाल्यामुळे व राष्ट्रीय नाट्य विद्यालय दिल्ली आयोजित बंगळूरू या ठिकाणी प्रतिष्ठित भारंगम महोत्सवात ‘ययाति’ नाटकाचे सादरीकरण झाल्यामुळे कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
नाटकापूर्वी विभागातील डॉ संजय सांगवीकर व चमूने नांदी सादर केली व त्यांनतर अभिनय जाधव व अंजली चव्हाण दिग्दर्शीत स्त्री अत्याचारांवर भाष्य करणारा हिंदी दीर्घांक ‘मजबूर’ सादर करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा विशाखा शिरवाडकर तर आभार डॉ संतोष गालफाडे यांनी मानले. यावेळी माजी विभागप्रमुख डॉ जयंत शेवतेकर, डॉ स्मिता पांढरे, डॉ गजानन दांडगे, डॉ स्मिता साबळे, डॉ रामदास ठोके, डॉ राखी सलगर आदीसह विद्यार्थी व रसिक उपस्थित होते.