डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ व्या महाराष्ट्र योग संमेलनाचे उद्घाटन
मानवतेचा विकास हेच योगाचे मुख्य ध्येय -’साई’च्या संचालक डॉ.मोनिका घुगे यांचे प्रतिपादन
१७५ योगशिक्षक, विद्यार्थ्यांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर : योग या शब्दाचा मुळ अर्थच जोडणे हा असून आत्म्याला परमात्याशी जोडण्याचे कार्य योगशास्त्र करते. मानवतेचा विकास हेच मुख्य ध्येय असणा-या योगाचा शास्त्रीयरितीने प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भारतीय खेल प्राधिकरण अर्थात ’साई’च्या संचालक डॉ.मोनिका घुगे यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर या काळात राज्यस्तरीय योग संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या नाटयगृहामध्ये आयोजित या योग संमलेनासाठी योग शिक्षक, योगाचार्य, तज्ञ मान्यवर असे एकूण १७५ सदस्य सहभागी झाले आहेत. संमेलनास बृहन्महाराष्ट्र योग परिषद, भारतीय ज्ञान परंपरा केंद्र, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती आदी संस्थांचे सहकार्य लाभले असून ’योग शास्त्राचे मूळ स्वरुप आणि त्यांची विविध क्षेत्रात उपयोगिता’ हा संमेलनाचा मुख्य विषय आहे.

कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२९) सकाळी उद्घाटन सोहळा झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, प्राचार्य डॉ.अरुण खोडस्कर, डॉ.सतीश मोहगांवकर, डॉ.उत्तम काळवणे, समन्वयक डॉ.सुहास पाठक आदींची उपस्थती होती. यावेळी डॉ.मोनिका घुगे यांनी उद्घाटनपर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, वैद्यकशास्त्रामध्ये एकूण पाच प्रमूख विद्याशाखा असून या सर्वांना जोडण्याचे काम योगशास्त्र करते. योगाला वैज्ञानिक आधार असून एका धर्मांच्या अथवा विचारांच्या चौकटीत योगाला बांधता येणार नाही. आपल्या चंगळवादी व बाजारवादी जीवन व्यवस्थेत मानवी मुल्यांचे जतन करण्यासाठी योगाचा प्रचार प्रभावीपणे होणे गरजेचे आहे, असेही डॉ.घुगे म्हणाल्या. या संमेलनात डॉ.मन्मथ घरोटे (संचालक, योगसंस्था लोणावळा) यांचे बीजभाषण झाले. तर तीन दिवसात डॉ.मकरंद कांजाळकर, डॉ.अभय कुलकर्णी, डॉ.प्रदिप गर्गे, डॉ.सुनील लाबडे, डॉ.चारुलता रोजेकऱ डॉ.चारुलता देशपांडे, डॉ.सुरेश मिरकर, डॉ.चारुशिला जवादे, डॉ.मधूसुदन पेन्ना, डॉ.उलका नातू, डॉ.पी.आर.राजपूत, श्रीकष्ण मसकर, डॉ.रमेश पांडव, डॉ.अभिजीत शेळके, डॉ.माधुरी सावंत, प्रा.शशिकांत येवतकर, डॉ.पुरुषोत्तम उर्पवट यांचा समावेश आहे. समन्वयक डॉ.सुहास पाठक यांनी प्रास्ताविक केले. तर बनशंकरी हिरेमठ, सारिका रत्नपारखी व रुपाली येवले यांनी सूत्रसंचालन, परिचय व आभार प्रदर्शन केले. प्रारंभी योगशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी आसने, नृत्य सादर केले.

विद्यार्थ्यांसह पालकांनाही तणावमुक्तीचे धडे : कुलगुरु
आजघडीला विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांवरही मोठा ताण-तणाव असून ’सोशल पॅरालिसिस’ झाल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे योगशास्त्र विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांसाठी तणाव व्यवस्थापन व तणाव मुक्तीचे धडे देण्यात येणार आहेत, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी अध्यक्षीय समारोपात म्हणाले. चालु शैक्षणिक वर्षापासून हा विभाग स्वतंत्र करण्यात आला असून नवीन इमारत, सभागृह उभारण्यात येईल तसेच पीएम उषा अंतर्गत ११ कोटींचा निधी प्राप्त असून यातून ’तणाव व्यवस्थापन सभागृह’ व अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येतील, असेही मा.कुलगुरु म्हणाले. भारतीय ज्ञान परंपरेला पुढे नेण्याचे काम योग करीत असून राजाश्रय मिळणे गरजचे आहे, असे डॉ.गजानन सानप म्हणाले तर प्राचार्य डॉ.अरुण खोडस्कर यांनी बृहत महाराष्ट्र योग परिषदेच्या कार्यावर प्रकाश टाकला.