पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अमरावती विद्यापीठात अभ्यास शिबीराचे उद्घाटन
विद्यार्थीनींनो ! अहिल्याबाईसारखे कणखर व्हा – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते
अमरावती : कर्तृत्ववान, मुत्सद्दी, लढवय्या म्हणून देशभरात ज्यांची ख्याती आहे, अशा पुण्यश्लोक अहिल्याबाईसारखे विद्यार्थीनींनी कणखर, सक्षम व्हावे; असे आवाहन कुलगुरू डॉ मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र आणि आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विद्यापीठ परिसरातील डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राच्या सभागृहात एक दिवसीय अभ्यास शिबीरात अध्यक्षीय विवेचन करतांना कुलगुरूंनी विद्यार्थीनींना प्रस्तूत आवाहन केले.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून व्य प सदस्य, डॉ नितीन चांगोले, उद्घाटक म्हणून व्य प सदस्य डॉ व्ही एम उर्फ भैय्यासाहेब मेटकर, डॉ श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्राचे संचालक डॉ संदीप जोशी, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ श्रीकांत पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कुलगुरू पुढे म्हणाले, अहिल्याबाईच्या खांद्यावर इंदौर संस्थानची धुरा आल्यानंतर अनेक संकटे आलीत, मात्र त्यांनी समर्थपणे संकटांचा सामना केला. इंदौर शहराच्या विकासामध्ये त्यांचा फार मोठा हातभार आहे. द्वारका, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, ओंढा नागनाथ आदी तीर्थक्षेत्राचा त्यांनी विकास केला, याशिवाय अनेक मंदिरांचा अहिल्याबाईनी जीर्णोध्दार केला. अनेक मंदिरे, घाट उभारलीत. विविधांगी असे अहिल्याबाईचे व्यक्तित्व आहे. त्यामुळे विद्यार्थीनींनी अहिल्याबाईच्या चारित्र्यातून प्रेरणा घेऊन सक्षमपणे आपल्या पायावर उभे रहावे, असे आवाहन कुलगुरूंनी याप्रसंगी उपस्थित विद्यार्थीनींना केले.
अहिल्याबाईनी महिलांना सक्षम केले – डॉ भैय्यासाहेब मेटकर
उद्घाटनीय भाषण करतांना व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ भैय्यासाहेब मेटकर म्हणाले, अहिल्याबाईनी सामाजिक व शैक्षणिक कार्यच केले नाही; तर महिलांचे सक्षमीकरण सुद्धा केले. अहिल्याबाईना त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांच्याकडून लहानपणापासूनच राजनीतीचे धडे मिळाले. त्यामुळे त्यांनी आपले संस्थान सक्षमपणे सांभाळले. मंदिरांचे संरक्षण, सती प्रथेला बंदी, गोरगरीबांसाठी सोयीसुविधा अहिल्याबाईनी निर्माण केल्यात. त्यामुळेच त्यांचा लोकमाता म्हणून आदराने उल्लेख केला जातो, असेही डॉ मेटकर म्हणाले.
संत गाडगे बाबा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण व दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकेतून डॉ श्रीकांत पाटील यांनी अभ्यास शिबिरामागील भूमिका विषद केली. संचालन डॉ अभिजित इंगळे यांनी, तर आभार डॉ प्रिती निकम यांनी मानले. उद्घाटन कार्यक्रमाला प्राधिकारिणींचे सदस्य, विद्यापीठातील शिक्षकवृंद, अधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.