अमरावती विद्यापीठात राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन

विदर्भाचा असमतोल निवारण्यासाठी सर्वंकष प्रयत्न आवश्यक – डॉ संजय खडक्कार

विद्यापीठात ‘विदर्भातील प्रादेशिक असमतोल : स्वरुप, आव्हाने आणि उपाय’ विषयावर चर्चासत्राचे उद्घाटन

अमरावती : विदर्भात 1994 पर्यंत जो अनुशेष होता, त्यात आणखी वाढ झाल्याचे एकंदरीत दिसते. मात्र हा अनुशेष दूर करावयाचा असेल, तर त्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य डॉ संजय खडक्कार यांनी मांडले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्र व विदर्भ अर्थशास्त्र परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 9 ऑगस्ट रोजी आयोजित ‘विदर्भातील प्रादेशिक असमतोल : स्वरुप, आव्हाने आणि उपाय’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्रात बीजभाषण देतांना ते बोलत होते.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे, उद्घाटक म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविंद्र कडू, डॉ प्रवीण रघुवंशी, वसंतराव नाईक मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे पाटील, विदर्भ अर्थशास्त्र परिषदेचे अमरावती विभागाचे सचिव डॉ संजय कोठारी, नागपूर विभागाचे सचिव विठ्ठल घिनमिने, डॉ पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्राचे समन्वयक डॉ महेंद्र मेटे उपस्थित होते.

डॉ खडक्कार पुढे म्हणाले, 1994 पासून विदर्भाच्या अनुशेषावर अभ्यासच झाला नाही. एकूण अनुशेषापैकी विदर्भाचा 47.60 टक्के अनुशेष आहे. सिंचनाचा तर 10 लाख हेक्टरचा अनुशेष आहे. सध्याच्या परिस्थितीत तर हा अनुशेष यापेक्षाही अधिक असेल. त्यामुळे अनुशेष दूर करावयाचा असेल, तर एक उच्चस्तरीय समिती गठीत करुन हा अनुशेष सरकारच्या निदर्शनास आणून दिला पाहिजे. वैधानिक विकास मंडळे कार्यान्वित असतांना कोणत्या क्षेत्राचा किती अनुशेष आहे, कोणत्या क्षेत्राला किती निधीची गरज आहे, याची माहिती राज्यपाल कार्यालयाला दिली जात होती व राज्यपालांकडून अनुशेष दूर करण्यासाठी शासनाला निर्देश दिले जात होते, मात्र आता वैधानिक विकास मंडळेच उरली नसल्याने सरकारलाही ते कळत नाही. कोणत्याही क्षेत्राचा विकास करावयाचा असेल, तर त्यासाठी कुशल मनुष्यबळ देखील तितकेच आवश्यक असल्याचे डॉ. खडक्कार म्हणाले. उद्योग असेल तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर हवाई वाहतुक सुविधाही गरजेच्या असल्याचे सांगून प्रत्येक जिल्ह्राचा विकासाचा आराखडा तयार झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.

Advertisement

उद्घाटनीय भाषण करतांना डॉ प्रवीण रघुवंशी म्हणाले, महाराष्ट्र व गुजरात राज्याला संविधानाच्या 371 कलमान्वये विशेष राज्यांचा दर्जा दिलेला आहे. सदर कलमाच्या उपकलमान्वये राज्यपालांना राष्ट्रपतींनीच अनुशेष दूर करण्याचे निर्देशही दिले होते. राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणे आवश्यक आहे. सिंचन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. शिक्षण व रोजगारात समन्यायी वाटपाची तरतूद झाली पाहिजे, असे डॉ रघुवंशी म्हणाले.

प्रमुख अतिथी डॉ रविंद्र कडू म्हणाले, शेतीतील पिकांचे प्रकार बदलत चालले आहेत. नगदी पिकांकडे शेतक-यांचा कल वाढला आहे. शेतकरी आत्महत्येमागे अनेक कारणे असू शकतात. 2013 मध्ये केळकर समितीने दिलेल्या अहवालानंतर एक समिती स्थापन करण्यात आली होती, परंतु त्या समितीचा अहवाल अजूनही सरकारला मिळाला नाही. राजकीय नेतृत्वाची यासाठी आज गरज असल्याचे सांगून या चर्चासत्राच्या माध्यमातून शासनाकडे आपल्याला काही सूचना सुध्दा करता येतील, असे ते म्हणाले.

वसंतराव नाईक मिशनचे अध्यक्ष अॅड निलेश हेलोंडे पाटील म्हणाले, शेतक-यांना पर्यायी पिके घेता आली पाहिजेत. उत्पन्नाचे मार्ग वाढविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सुध्दा आपले प्रयत्न सुरू आहेत व पशूंसाठी चा-याची व्यवस्था म्हणून 600 एकरमध्ये ई-क्लास जमिनीमध्ये चारा लागवड करण्यात आली. त्यातून शेतक-याला उत्पन्न मिळाले व सोबतच पशूच्या चा-याची व्यवस्थाही झाली. शेतीला जोडधंदा म्हणूनही शेतक-यांनी पर्यायी मार्ग शोधावे, जेणेकरुन उत्पन्न वाढेल. रेशीम उद्योगाबाबत विदर्भात पाहिजे तेवढा या उद्योगाला प्रतिसाद नाही,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. अनुशेष कमी करण्यासाठी शेतीमध्ये अभिनव प्रयोग होणे आवश्यक आहेत. शेतकरी आत्महत्यांसारखे प्रकार होऊच नये, यासाठी मिशनकडून प्रयत्न सुरू असल्याचे अॅड. हेलोंडे म्हणाले.

अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे म्हणाले, विषय़ाच्या अनुषंगाने उपाय अधिक महत्वाचे आहेत. असमतोल आहेच, परंतु त्यावर आता उपाय करणे देखील तितकेच गरजेचे आहे. आजच्या या चर्चासत्रातून निश्चितच मार्ग निघेल असा विश्वास व्यक्त करुन विद्यापीठाकडूनही प्रयत्न केले जातील, जेणेकरुन या चर्चासत्राचे फलित होईल.

संत गाडगे बाबा, डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण, दीपप्रज्वलन करुन विद्यापीठ गीताने चर्चासत्राची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकामधून डॉ महेंद्र मेटे यांनी चर्चासत्र आयोजनाचा उद्देश सांगितला. सूत्रसंचालन प्रा शशिकांत दुपारे यांनी, तर आभार डॉ संजय कोठारी यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ पी एस नारखेडे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ नितीन चांगोले, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रामे·ार भिसे, संत गाडगे बाबा अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ दिलीप काळे तसेच विद्यापीठातील विविध प्राधिकारिणींचे सदस्य, अर्थशास्त्र विषयातील तज्ज्ञ, अभ्यासक, शिक्षक, अधिकारी, विद्यार्थी तसेच पत्रकार व गणमान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page