देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे चित्तेगाव येथे उद्घाटन
राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना समाजाभिमुख बनवते – त्र्यंबकराव पाथ्रीकर
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि म. शि. प्र. मंडळ संचलित देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने चित्तेगाव याठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष वार्षिक शिबिराचे आयोजन केले. सदरील शिबीर हे दि. 15 जानेवारी ते 21 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये संपन्न होत आहे. या शिबिराचे उद्घाटन म. शि. प्र. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य त्र्यंबकराव पाथ्रीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. त्र्यंबकराव पाथ्रीकर या प्रसंगी बोलताना असे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना हा शासनाचा अतिशय चांगला उपक्रम असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वतःचे चरित्र घडविण्यासाठी एक चांगली संधी आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी गावातील समस्या समजून घेऊन श्रमदान करावे. या शिबिरात विद्यार्थ्यांनी सक्रीयपणे सहभागी व्हावे व राष्ट्र विकासात आपले योगदान द्यावे. कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ हे उपस्थित होते. याप्रसंगी सोहम वायाळ म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम हा विद्यार्थी आणि ग्रामीण भाग यांना जोडणारा दुआ आहे. या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील प्रथा, परंपरा समजून घेणे गरजेचे आहे. गावात अनेक असे उपक्रम राबविले जातात की ज्यांच्या माध्यमातून व्यक्तीमत्व विकास साधला जाऊ शकतो. युवकांनी स्वतः पुढाकार घेऊन समस्या समजून घ्याव्यात व त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत. भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांनी सहभागी होणे गरजेचे आहे.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. अशोक तेजनकर हे होते. अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात सहभागी होणारे विद्यार्थी भविष्यात नक्कीच यशस्वी होतात. हे विद्यार्थीही राष्ट्राची खरी संपत्ती आहे, कारण हे विद्यार्थी निस्वार्थीपणे काम करतात, श्रमदान करतात व राष्ट्र विकासात योगदान देतात. या शिबिरात आपण रचनात्मक कार्य करुन याठिकाणावरुन निश्चितपणे चांगल्या आठवणी घेऊन जाव्यात व यशस्वी जीवनाकडे वाटचाल करावी. या शिबिरात राबविण्यात येणाऱ्या बालविवाह प्रतिबंध, मतदान जनजागृती, जल व्यवस्थापन, अन्न सुरक्षा, पर्यावरण विकास आदी उपक्रम समाजासाठी, गावातील लोकांसाठी निश्चितपणे लाभदायक ठरतील.
या कार्यक्रमात चित्तेगावच्या सरपंच पारुताई खंडागळे आणि उपसरपंचश्री मंगेश गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराच्या आयोजनासाठी उपप्राचार्य प्रोफेसर दिलीप खैरणार, डॉ. अनिल अर्दड, डॉ. अपर्णा तावरे यांनी सहकार्य केले. रा. से. योजनेचे महाविद्यालयीन समन्वयक व कार्यक्रमाधिकारी डॉ.अनंत कनगरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाधिकारी डॉ. भाऊसाहेब शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. उद्घाटन समारंभ झाल्यानंतर पैठण तहसील कार्यालयातील इव्हीएम प्रशिक्षक श्री पी. एल. लवंडे यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना इव्हीएमचे प्रात्यक्षिक दाखविले. याप्रसंगी चित्तेगावचे प्रतिष्ठित नागरिक, युवक, रा.से. यो.चे सल्लागार समितीचे प्रा. माणिक भताने, डॉ. रंजना चावडा, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा पाटील आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश वाघमारे, राहुल वाघमारे, शुभम खंडागळे, अभिषेक गावंडे, रा. से. यो. स्वयंसेवक व गावकरी यांनी सहकार्य केले.