एमजीएम रुग्णालयात ‘सोनोसर्ज’ कार्यशाळेचे उद्घाटन संपन्न

देशातल्या पहिल्या सोनोसर्ज कार्यशाळेचे एमजीएममध्ये आयोजन

छत्रपती संभाजीनगर : असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि एमजीएम रुग्णालय व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरातील सर्जन्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘सोनोसर्ज’ या सोनोग्राफी प्रशिक्षण कार्यशाळेचे द्योतन सभागृह येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ प्रविण सूर्यवंशी, डॉ आर सी श्रीकुमार, अधिष्ठाता डॉ राजेंद्र बोहरा, डॉ राजेंद्र शिंदे, डॉ भास्कर मुसांडे, डॉ प्रसन्ना मिश्रीकोटकर व सर्व संबंधित उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुलपती अंकुशराव कदम म्हणाले, गेल्या सहा – सात दशकात या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाली असून या प्रगतीचा मी साक्षीदार राहिलेलो आहे. या प्रकारच्या राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा एमजीएम आयोजित करीत आले आहे. आधीच्या काळामध्ये आजारी पडल्यास डॉक्टरकडे जाणे कठीण काम होते. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजियन्समुळे अनेक कठीण शस्त्रक्रिया आपण सहजपणे करू शकत आहोत. मेडिकलमधील सर्व विविध शाखा आता एकमेकांसमवेत यशस्वीपणे काम करीत आहेत. यामुळे रुग्णांची सोय झाली असून जलदगतीने शस्त्रक्रिया आणि उपचार होत आहेत, ही निश्चितपणे आनंदाची बाब आहे.

Advertisement

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे एकूण ३८००० सभासद असून सर्जन्ससाठी कार्यरत असणारी ही देशपातळीवरील एक नामांकित संस्था आहे. ही संस्था देशातील सर्व सर्जन्सची शिखर संस्था म्हणून कार्यरत आहे. आज एमजीएममध्ये संस्थेच्या माध्यमातून होत असलेली ‘सोनोसर्ज’ ही देशातील अशा प्रकारची पहिली कार्यशाळा घेत असताना मनापासून आनंद होत आहे. विशेषत : एमजीएम आणि छत्रपती संभाजीनगरसाठी ही भाग्याची बाब असल्याचे प्रतिपादन असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष डॉ प्रविण सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

डॉप्रविण सूर्यवंशी पुढे बोलताना म्हणाले, असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया ही संस्था विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून सर्जन्स यांना प्रशिक्षण देणे, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असते. याचाच भाग म्हणून आज देशभरातील सर्जन्स येथे सहभागी झाले असून त्यांना या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्जन्स अधिक जलद, अचूक, आणि सुरक्षितरित्या शस्त्रक्रिया करू शकणार आहेत.

असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रोबल नेओगी हे दुरदृश्यप्रणालीमार्फत कार्यशाळेत सहभागी झाले होते. या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन झाले असे त्यांनी अधिकृतरित्या जाहीर करून उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, आजचा दिवस हा असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियासाठी ऐतिहासिक दिवस असून छत्रपती संभाजीनगर शहर या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होत आहे. भविष्यात अशा प्रकारचे आणखी उपक्रम आम्ही राबवू हा विश्वास, यावेळी व्यक्त करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page