उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सौर उर्जा प्रकल्पाचे १५ जुलै रोजी उद्घाटन
तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन
जळगाव : महाराष्ट्र शासन व जळगाव जिल्हा नियोजन विकास समिती यांच्या निधीतून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात उभारण्यात आलेल्या सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटन तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन सोमवार दि १५ जुलै, २०२४ रोजी विद्यापीठात होणार आहे. सोमवारी सायंकाळी ०४:३० वाजता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन व पुतळा उभारणीचे भूमिपुजन होणार आहे.
यावेळी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन, तसेच मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. सौर उर्जा प्रकल्पासाठी व बहिणाबाई चौधरी यांच्या नियोजित पुतळ्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात आलेला आहे. दोन वर्षांपुर्वी विद्यापीठात या सौर उर्जा प्रकल्प उभारणीला सुरुवात झाली हेाती. यासाठी ३ कोटी ६६ लाख रूपये निधी मंजूर झाला. ६५० किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे प्रति माह ३०% विज बिलात बचत होणार आहे.
बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ५३ लाख ७० हजार निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पुतळा उभारण्याचे काम केले जात आहे. फेबुवारी २०२५ अखेर हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारती समोरील दर्शनिक परंतु मध्यवर्ती भागात अर्धकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. अशी माहिती कुलसचिव डॉ विनोद पाटील यांनी दिली.