गोंडवाना विद्यापीठातील आदर्श पदवी महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
महाविद्यालय कौशल्य विकास केंद्राचे “चाणक्य कौशल्य विकास केंद्र”असे नामकरण
आभासी पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
गडचिरोली : राज्यातील 1000 महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील पात्र महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरु करण्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. गोंडवाना विद्यापीठातील आदर्श पदवी महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आभासी पद्धतीने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
आदर्श पदवी महाविद्यालय येथे उद्घाटन कार्यक्रमात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. एस. चंद्रमौली, वित्त व लेखाधिकारी भास्कर पठारे, प्रा. डॉ. क्रिष्णा कारु, समन्वयक भरत घेर आदी उपस्थित होते.
आभासीची पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन करतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील युवक युवतीच्या विकासासाठी महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र स्थापन करून रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. तेव्हाच राज्यातील युवक कौशल्यक्षम होऊन रोजगाराची निर्मिती करू शकतील. भारतात चाणक्य नीति सुपरिचित आहे. या कौशल्य विकास केंद्रास चाणक्य कौशल्य विकास केंद्र असे नाव देण्यात येत आहे.
तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी स्किल डेव्हलपमेंट इंडिया हे पोर्टल विकसित केले आहे. सदर पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळविण्याच्या दृष्टीने रोजगाराभिमुख शिक्षणाची दारे उघडे करून देण्याचा दृढ संकल्प करूया असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तदनंतर, आदर्श पदवी महाविद्यालयातील कार्यक्रमात बोलतांना प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षण घेतल्यास त्या कौशल्याच्या आधारावर स्वयंरोजगार करता येतो तसेच विविध उद्योगधंदे तसेच नोकऱ्यांमध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो या विज्ञान युगात कौशल्य आधारित शिक्षण घेणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.
प्रस्ताविकेत बोलतांना अधिष्ठाता डॉ. चंद्रमौली म्हणाले, आदर्श पदवी महाविद्यालयात कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कौशल्य आधारित अभ्यासक्रमाकडे वळावे. व स्वयंरोजगारासाठी उपयोग करावा. आजच्या स्पर्धेच्या जगात आपल्या युवक – युवतींना सक्षम बनवण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सुरु केलेले कौशल्य विकास केंद्र महत्वाची भूमिका बजावतील. असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह समन्वयक, कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहकार्य केले.