स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहा दिवसीय संगीत कार्यशाळेचे उद्घाटन
विद्यापीठातील संगीत विभागाची वाटचाल अत्यंत गौरवशाली- पं. व्यंकटजी कोत्तापल्ले
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संगीत विभागाची वाटचाल अत्यंत गौरवशाली आहे, हा विभाग अत्यंत कमी कालावधीत नावारूपाला आला आहे. तसेच विविध स्पर्धा, महोत्सव, उपक्रमांमधून हा विभाग अत्यंत प्रभावीपणे कार्यरत असतो असे प्रतिपादन प्रा. पं. व्यंकटजी कोत्तापल्ले यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील संगीत विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहा दिवसीय संगीत कार्यशाळेत केले. विद्यापीठातील संगीत विभागाच्या वतीने ललित व प्रयोगजीवी कला संकुलात सहा दिवसीय संगीत कार्यशाळेचे उद्घाटन दि. १२ फेब्रुवारी रोजी पार पडले. या उद्घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर तर उद्घाटक म्हणून भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक डॉ. रमेश ढगे यांनी स्थान भूषविले. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी पं. व्यंकट कोत्तापल्ले यांनी ‘ख्याल एक विचार’ या विषयावर मार्गदर्शन केले. अत्यंत साध्या, सोप्या पद्धतीने पंडितजींनी या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दि. १३ फेब्रुवारी रोजी शहरातील यशवंत महाविद्यालयातील संगीत विभागाच्या प्रा. संगीता चाटी यांनी अत्यंत प्रभावशाली पद्धतीने दशथाट व रियाज या विषयावर मार्गदर्शन केले. दि. १४ व १५ फेब्रुवारी रोजी श्रीमती सुरजदेवी मोहता महिला महाविद्यालय, खामगाव येथील प्रा. ज्ञानेश्वर बोंपिलवार यांनी ताल व लयकारी या विषयावर साध्या, सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच १६ फेब्रुवारी रोजी गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या शिष्या विदुषी मधुवंती देव यांनी राग विस्तार (गायकी, रियाज, अभ्यास) या विषयावर अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन केले. १३ व १५ तारखेचे सत्र शिक्षणशास्त्र संकुलाचे डॉ. महेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. या कार्यशाळेला प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. रमाकांत चाटी यांनी तबल्याची तर प्रा. नामदेव बोंपिलवार यांनी संवादिनीची विविध सत्रात साथसंगत केली. या कार्यशाळेला संकुलातील विद्यार्थ्यांसह शहरातील अनेक संगीतप्रेमी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यशाळेसाठी संकुलातील डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत, प्रा. प्रशांत बोंपिलवार, प्रा. नामदेव बोंपिलवार, निशिकांत गायकवाड व प्रकाश रगडे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच या कार्यशाळेसाठी संकुलातील नाट्य विभागाचे डॉ. अनुराधा पत्की, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. अभिजित वाघमारे हे प्राध्यापक उपस्थित होते.