हिंदी विश्वविद्यालयाच्या दूरस्थ शिक्षण निदेशालया द्वारे श्री धर्मपाल स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन
धर्मपाल यांनी भारताचे स्वत्व ओळखण्याचे काम केले : कुलगुरू प्रो हनुमानप्रसाद शुक्ल
वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या दूरस्थ शिक्षण निदेशालया द्वारे श्री धर्मपाल स्मृती व्याख्यानमालेच्या उद्घाटन कार्यक्रमाची अध्यक्षता करतांना कुलगुरू प्रो हनुमानप्रसाद शुक्ल म्हणाले की धर्मपाल यांनी भारताची ओळख पटवण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत भारताचे भविष्य घडवण्याची चिंता होती. ते महात्मा गांधींच्या शाश्वत भारताच्या संकल्पनेचे प्रचारक होते. त्यांनी अनेक महत्त्वाचे लेखन केले आणि भारत समजून घेण्यासाठी अंतर्दृष्टी प्रदान केली.

या प्रसंगी साहित्य विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो अवधेश कुमार, मानविकी व सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता फरहद मलिक, शिक्षण विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो गोपाल कृष्ण ठाकुर आणि विधी विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रो जनार्दन कुमार तिवारी यांनी धर्मपाल यांच्या कार्यावर आणि त्यांच्या जीवन तत्वज्ञानावर प्रकाश टाकला. प्रो अवधेश कुमार म्हणाले की धर्मपाल यांनी भारताच्या मूलभूत परंपरेला आत्मसात केले आणि स्वदेशी शिक्षण आणि सर्वोदयाच्या भावनेने महात्मा गांधींचे अनुसरण केले.
प्रो फरहद मलिक म्हणाले की धर्मपाल यांनी भारतीय ज्ञान परंपरेला भारतीय शिक्षण धोरणात समाविष्ट करण्याचे काम केले. प्रो गोपाल कृष्ण ठाकुर म्हणाले की भारतीय ज्ञान परंपरेबाबत खोट्या मिथकांची निर्मिती करण्यात आली आहे ज्यामुळे भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेबद्दलचे सत्य समोर आले नाही. धर्मपाल यांनी पंचायती राजवर लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख करताना प्रो जनार्दन कुमार तिवारी म्हटले की स्वातंत्र्यापूर्वीही भारतात पंचायती राज व्यवस्था अस्तित्वात होती.
स्वागत भाषण व विषय प्रवर्तन करतांना दूरस्थ शिक्षण निदेशालयाचे निदेशक प्रो आनन्द पाटील म्हणाले की धर्मपाल यांचे कार्य तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी व्याख्यानांची मालिका आयोजित केली जात आहे. धर्मपाल यांनी ब्रिटन आणि भारतभर ३० वर्षांहून अधिक काळ प्रवास केला आणि भारताला जाणून आणि समजून घेण्याचा भारतीय दृष्टिकोन दिला. त्यांनी सांगितले की या व्याख्यानमालेअंतर्गत दरमहा एक व्याख्यान होईल आणि बारा व्याख्यानांच्या मालिकेवर एक पुस्तक तयार केले जाईल.
कार्यक्रमाचे संचालन असोशिएट प्रोफेसर डॉ शंभू जोशी यांनी केले तर डॉ अमरेंद्र कुमार शर्मा यांनी आभार मानले. प्रारंभी पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला आणि धर्मपाल यांच्या छायाचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलन आणि कुलगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली.
कार्यक्रमात शिक्षक, शोधार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.