गोंडवाना विद्यापीठात संत तुकाराम महाराज प्रबोधन शिबिराचे उद्घाटन
संत तुकारामांच्या प्रबोधनातून मिळणारा संदेश समाजासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी – डॉ नंदकुमार मोरे
गडचिरोली : संत तुकारामाची करुणा, दया आणि सेवेचा बोध त्यांच्या अभगांच्या रुपाने आजही आपल्यात आहे. संत तुकारामांचे अभंग आजही उर्जा देणारे असून दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देतात. संत तुकारामांनी विविध अभंगातून जीवनाची रहस्य उलगडलीत. संत तुकारामांनी अनेक विषयांवर प्रबोधने केली असून त्यांच्या प्रबोधनातून मिळणारा संदेश समाजासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख व संत तुकाराम अध्यासन केद्राचे प्रमुख डॉ नंदकुमार मोरे यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात, एक दिवसीय संत तुकाराम महाराज प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रबोधनाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करतांना डॉ नंदकुमार मोरे बोलत होते.
कार्यक्रमाला गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ धनराज पाटील, नवी दिल्ली साहित्य अकादमीचे सदस्य डॉ प्रमोद मुनघाटे, सुप्रसिद्ध संशोधक व लेखक डॉ अशोक राणा, प्रवचनकार अशोक सरस्वती, मराठी विभागाचे समन्वयक तथा रा से यो संचालक डॉ शाम खंडारे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ हेमराज निखाडे, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
मराठी विभाग प्रमुख व संत तुकाराम अध्यासन केद्राचे प्रमुख डॉ नंदकुमार मोरे म्हणाले, अध्यासनाचा हेतू आणि उद्देश समाजसुधारकांचे कार्य तळागळात पाहोचविणे तसेच त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणे हा आहे. आजची तरुण पिढी भरकटत चालली असून त्यांना मार्गदर्शक म्हणून आजच्या घडीला तुकोबांसारख्या मार्गदर्शकाची आवश्यकता आहे. तुकारामांनी शब्दरुपी धन मागे ठेवले असून त्यांचे कवित्व ही धनसंपत्ती आहे. त्यांचे कवित्व समजून घेतल्याशिवाय तुकाराम समजणार नाही. संत तुकारामांचे अभंग आजही प्रेरणादायी असून तुकारामांच्या गाथेसारखा दुसरा ग्रंथ व मार्गदर्शक नाही. तुकारामांनी भक्तीची, धर्माची आणि प्रेमाची परीभाषा बदलली आणि जिवनाचा अर्थ तसेच मर्म सांगितला. तुकाराम महाराजांच्या अभंगातील तत्त्वज्ञान आचरणात आणणे ही खरी त्यांच्या बद्दलची कृतज्ञता असल्याचे डॉ नंदकुमार मोरे म्हणाले. यावेळी डॉ नंदकुमार मोरे यांनी तुकारामांची गाथा गोंडवाना विद्यापीठास भेट दिली.
सुप्रसिद्ध संशोधक व लेखक डॉ अशोक राणा म्हणाले, संत तुकारामांनी वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा निर्माण केली. संपूर्ण जगाला उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखविणारे संत तुकाराम महाराज आहेत. अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. त्यांचे अभंग अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये आजही कायम आहे. तुकाराम महाराज वास्तववादी, निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महापुरुषांच्या जीवनात संत तुकाराम यांच्यासारख्या संताची महत्वाची भुमीका असल्याचे डॉ राणा म्हणाले. त्यासोबतच, गोंडवाना विद्यापीठाने संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र सुरु केले आहे. या अध्यासनाच्या माध्यमातून संताना समजून घेण्याची संधी मिळाली आहे. हे अध्यासन केंद्र विदर्भात प्रेरणादायी ठरावे असेही डॉ राणा म्हणाले.
प्रास्ताविकेतून बोलतांना जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक, डॉ हेमराज निखाडे म्हणाले, 30 जानेवारी 2024 रोजी या अध्यासन केंद्राची स्थापना करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांच्या युगप्रवर्तक सामाजिक प्रबोधन कार्याचे नवीन पिढीत संक्रमण करण्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम अध्यासन केंद्राच्या वतीने एक दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संत तुकारामांचे अभंग समाजाला तसेच जनसामान्याला दिशा देणारे असून तुकारामांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे.
मान्यवरांचा परीचय मराठी विभागाच्या सहा प्राध्यापक डॉ सविता गोविंदवार यांनी करुन दिला. कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ निळकंठ नरवाडे यांनी केले. तत्पुर्वी, मान्यवरांच्या हस्ते संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.