उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साने गुरूजी व्याख्यानमालेचे उद्दघाटन
जळगाव : राष्ट्र उभारणीत शिक्षण व्यवस्था सक्षम असणे गरजेचे असून त्यासाठी शिक्षणावरील खर्च वाढविणे आवश्यक आहे. त्यासोबतच खाजगीकरण आणि व्यापारीकरणाचा पुर्नविचार करावा लागेल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात याअनुषंगाने प्रयत्न सुरु असले तरी समाज, स्वयंसेवी संस्था यांनी देखील पुढाकार घेतला तरच समृध्द भारताचे स्वप्न साकार होईल असे प्रतिपादन राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राचार्य डॉ पी डी देवरे यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्या विकास मंडळाचे सी गो पाटील महाविद्यालय, साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाईन झालेल्या साने गुरूजी व्याख्यानमाले अंतर्गत ते बोलत होते. सी गो पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे हे अध्यक्षस्थानी होते.
डॉ देवरे यांनी ‘राष्ट्र निर्माणात शिक्षणाचे महत्व’ या विषयावर सविस्तर मांडणी केली. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक युगातील शिक्षण व्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला. उत्तम माणूस घडत नाही तोवर उत्तम राष्ट्र निर्माण होणार नाही म्हणून उत्तम मनुष्य घडविण्याची प्रक्रिया शिक्षणातूनच घडत असते. प्रगत आणि विकसित राष्ट्रांनी शिक्षणाला महत्व दिले. भारतात १९व्या शतकाच्या प्रारंभी नव्या राष्ट्रवादाची संकल्पना मांडली गेली. त्याचा पाया राष्ट्रीय शिक्षण हाच होता. त्यासाठी समाजसुधारक आणि क्रांतीकारक यांनी मोठे योगदान दिले. त्यातूनच स्वातंत्र्य मिळाले.
स्वतंत्र भारतात मोठ्या संस्था व उद्योग उभे राहिले. समाजाचा सकलविकास हा शिक्षणाच्या माध्यमातून होत असतो. राज्यकर्ते आणि शिक्षणव्यवस्था यांचा परस्पर संबंध दिसून येतो. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून समृध्द आणि विकसित राष्ट्र घडवायचे असेल तर केवळ शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. तर समाज, स्वयंसेवी संस्था, नागरिक यांना पुढे यावे लागेल. काही विसंगती निर्माण होण्याचा धोका आहे. धर्मांधता, अंधश्रध्दा, प्रांतवाद वाढण्याची भिती आहे. गरीबी, बेरोजगारी, उपासमार तसेच वंचित आणि महिलांचे प्रश्न कसे सोडविता येतील याचा विचार करावा लागेल. शिक्षणावरचा खर्च वाढवावा लागेल त्यातून शिक्षण व्यवस्था बळकट झाली तरच समृध्द भारताचे स्वप्न साकार होईल असे डॉ देवरे म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ राजेंद्र अहिरे यांनी चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविण्याची प्रक्रिया विद्यापीठामार्फत केली जात असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ सचिन नांद्रे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच सूत्रसंचालन डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. प्रा सुरेंद्रसिंग मगर यांनी आभार मानले.