अनुदानातून अमरावती विद्यापीठात विविध शैक्षणिक व संशोधनपर उपक्रम पूर्ण होतील – कुलगुरू डॉ मिलींद बारहाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी.एम. – उषा प्रोजेक्ट लाँच

अमरावती : देशभरातील 400 विद्यापीठांपैकी 78 विद्यापीठांना पीएम – उषा योजनेंतर्गत अनुदान मिळणार आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला 20 कोटी रूपयांचे अनुदान केंद्र शासनाने या योजनेंतर्गत मंजूर केले आहे. त्याचे लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते जम्मू काश्मीर राज्यामधून आभासी पद्धतीने करण्यात आले. विद्यापीठातील डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख अधिसभा सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ तुषार देशमुख उपस्थित होते. पंतप्रधान यांनी पीएम – उषा प्रोजेक्ट लाँच केल्यानंतर संबोधित करतांना सांगितले, देशभरातील शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण व्हावे, त्या माध्यमातून शिक्षण, संशोधन व कौशल्याच्या संधी विद्यार्थ्यांना मिळाव्यात तसेच त्यांच्या माध्यमातून देशाचा विकास व्हावा, या उद्देशाने 3,000 कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदान विविध विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांना दिले आहेत.

Advertisement

कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, विद्यापीठाच्या विकासासाठी हे अनुदान आवश्यक होते. विद्यापीठात अनेक योजना आहेत, त्या योजनांवर काम करण्याकरीता अनुदान गरजेचे होते. आता अनुदान मंजूर झाल्यामुळे आपल्याला अधिक चांगल्या योजना व उपक्रम राबविता येईल. त्यामुळे विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडेल आणि त्याचा जास्तीतजास्त लाभ विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना होईल.

याकरीता गठीत समिती तसेच अधिकारी व शिक्षकांनी उत्कृष्टरितीने सादरीकरण करुन हे अनुदान प्राप्त करण्याकरीता सहकार्य केल्याबद्दल त्यांचे सुद्धा त्यांनी अभिनंदन केले. भविष्यात आणखी चांगले उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. या पी.एम. – उषा योजनेंतर्गत पायाभूत सुविधा व बांधकाम – 16 कोटी, रिनोव्हेशन अॅन्ड अपग्रेडेशन – 1.95 कोटी, वैज्ञानिक उपकरणांची खरेदी – 1.2 कोटी, सॉफ्ट कम्पोनन्ट – 0.85 कोटी, असा निधी प्राप्त होणार आहे.

प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर यांनी यावेळी सांगितले, मार्च 2026 पर्यंत ही योजना आहे. या योजनेत मिळालेल्या अनुदानातून जलद गतीने कामे केल्या जाईल आणि येणा­या नॅकमध्ये विद्यापीठाचा ग्रेड वाढविण्याकरीता ते उपयुक्त राहील. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार उपकुलसचिव (विकास) डॉ. सुलभा पाटील यांनी मानले. यावेळी सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता, संवैधानिक अधिकारी, शैक्षणिक व प्रशासकीय विभागप्रमुख, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page