शिवाजी विद्यापीठामार्फत ‘फोटो ऑफ द विक’ स्पर्धेचे उद्घाटन

दर आठवड्यास विद्यार्थ्यांना फोटो ऑनलाईन अपलोड करता येणार; प्रमाणपत्रही मिळणार

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि प्रशासकीय सेवक यांच्यातील सृजनशीलतेला संधी देण्याच्या हेतूने विद्यापीठामार्फत ‘फोटो ऑफ दि विक’ ही स्पर्धा दर आठवड्याला ऑनलाईन स्वरुपात आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये विद्यापीठात प्रवेशित विद्यार्थ्यांनी आवर्जून सहभाग नोंदवावा, असे आवाहन कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी येथे केले.

शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ‘फोटो ऑफ दि विक’ या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

कुलगुरू डॉ शिर्के यांच्या हस्ते आज सायंकाळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात ‘फोटो ऑफ दि विक’ (आठवड्याचे छायाचित्र) या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ विलास शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ प्रकाश गायकवाड, मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ नंदकुमार मोरे, पदार्थविज्ञान विभागाचे डॉ मानसिंग टाकळे उपस्थित होते. यावेळी संगणक केंद्र संचालक अभिजीत रेडेकर आणि आशिष घाटे यांनी स्पर्धेविषयी सादरीकरण केले. जनसंपर्क अधिकारी डॉ आलोक जत्राटकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ पासून विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात येणारी फोटो ऑफ द विक ही स्पर्धा विद्यापीठ अधिविभागामध्ये प्रवेशित विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी यांच्याकरिता आयोजित करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा ऑनलाईन स्वरुपात विद्यापीठ पोर्टलवर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठीची नियमावली पुढीलप्रमाणे:

Advertisement

१. सदर स्पर्धेत शिवाजी विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी सहभागी होऊ शकतील.

२. सहभागी स्पर्धकाला दर आठवड्यात जास्तीत जास्त २ छायाचित्रे अपलोड करता येऊ शकतील.

३. छायाचित्रे शिवाजी विद्यापीठ परिसरातीलच असावीत. (आवश्यक तेथे जिओ-टॅगिंग करावे.)

४. विद्यापीठ परिसर येथील निसर्ग व पशूपक्षी यांची व तद अनुषंगिक छायाचित्रे असावीत. सेल्फी अथवा व्यक्तीकेंद्रीत छायाचित्रे अपलोड करु नयेत.

५. छायाचित्रे 10 MB पेक्षा मोठ्या आकाराची असू नयेत. तसेच ती लँडस्केप स्वरुपातील व JPG/JPEG फॉरमॅटमधील असावीत.

६. छायाचित्रे मूळ स्वरुपात (ओरिजिनल) सादर करावीत. संपादित स्वरुपातील असू नयेत.

७. छायाचित्र निवडीचे अधिकार विद्यापीठाने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.

८. दिशाभूल करणारी, चुकीची माहिती देणाऱ्या स्पर्धकांवर शिस्तभंग कारवाईचे अधिकार विद्यापीठ स्वतःकडे राखून ठेवीत आहे.

९. स्पर्धेसाठी सादर केलेल्या आणि निवडलेल्या छायाचित्रांचे सर्व अधिकार विद्यापीठाकडे राहतील. सदर स्पर्धेखेरीजही त्या छायाचित्रांचा वापर करण्याचा अधिकार विद्यापीठास राहील.

१०. सदर स्पर्धेचे परीक्षक व स्पर्धा आयोजनाशी संबंधित घटकांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

बक्षीस :

१. सर्वोत्कृष्ट छायाचित्रास विशेष प्रमाणपत्र देण्यात येईल.

२. सर्वोत्कृष्ट छायाचित्र शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्पर्धकाच्या नावासह प्रसिद्ध करण्यात येईल.

रजिस्ट्रेशन लिंक : विद्यार्थ्यांसाठी लिंक: https://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी लिंक: https://sukapps.unishivaji.ac.in/onlineaffiliation/#/login

या स्पर्धेसंदर्भातील सविस्तर परिपत्रक विद्यार्थी विकास विभागामार्फत काढण्यात आले असून ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर इच्छुकांना पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page