राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी निर्माणशास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन
औषधी निर्माणशास्त्र विभागात संशोधन लॅब उद्घाटित – कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधी निर्माणशास्त्र विभागात संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या प्रयोगशाळेचा उद्घाटन समारंभ मंगळवार, दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. या नूतनीकरण झालेल्या संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी फित कापून केले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. हरीश पालीवाल, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत माहेश्वरी, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. संजय कवीश्वर, मुंबई येथील जीवन विद्या मिशनचे माजी अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, एआयसीटीई सल्लागार-१ डॉ. राजेंद्र काकडे, नीतिका फार्माचे संचालक डॉ. राहुल खुराणा, विभाग प्रमुख डॉ. प्रमोद खेडेकर, डॉ. प्रकाश ईटणकर, डॉ. निशिकांत राऊत, डॉ. दादासाहेब कोकरे, डॉ. रिता वडेतवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. नूतनीकरण झालेल्या प्रयोगशाळेमध्ये डिफरेन्शियल स्कॅनिंग कलरीमिटर, हाय प्रेशर होमोजीनिजर, रोटा इव्यापोराटर, रेव्होमिटर, टॅबलेट कोटिंग मशीन, डीजोल्युशन टेस्ट ॲप्रेटस, हॉस्पिटल इन्क्युबेटर शेकर, कॉन्सन्ट्रेटर यांच्यासह अन्य महत्वपूर्ण उपक्रमांचा समावेश आहे.
औषधी निर्माणशास्त्र हा विभाग विद्यापीठातील जुन्या विभागांपैकी आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रशासन, विभागातील माजी विद्यार्थी संघटना त्याचप्रमाणे विभाग प्रमुख डॉ. प्रमोद खेडेकर व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी एकत्र येत या बदलास सुरुवात केली. औषधी निर्माण शास्त्र विभागातील सर्वच विभागांचे नूतनीकरण केले जात आहे. तळमजल्यावर असलेली औषधी निर्माण संशोधन प्रयोगशाळा नूतनीकरणानंतर सज्ज झाली आहे. नूतनीकरण झालेल्या संशोधन प्रयोगशाळेत अत्याधुनिक उपकरणे स्थापित करण्यात आली आहे. या अत्याधुनिक उपकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अचूक संशोधन करणे शक्य होणार आहे. विविध खोल्यांमध्ये असलेली विविध उपकरणांबाबत माहिती डॉ. रिता वडेतवार यांनी कुलगुरू यांच्यासह अन्य प्रमुख अतिथींना दिली.