कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात ‘श्रीराम महासंस्कृती उत्सवाअंतर्गत एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन
रामटेक / नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथे संपन्न होत असलेल्या श्रीराम महसंस्कृती महोत्सवा अंतर्गत “सांस्कृतिक पृष्ठभूमीवर महाकवी कालिदास” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न झाले. या चर्चासत्राला विशेष अतिथी या नात्याने रामटेक चे आमदार आशिषजी जयस्वाल उपस्थित होते. सारस्वत वक्ता म्हणून कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या म्हणून पूर्व कुलगुरू प्रो उमा वैद्य आणि विशेष वक्ता म्हणून नागपूर पूर्व पोलीस महासंचालक डॉ. भूषण कुमार उपाध्याय म्हणून उपस्थित होते. या चर्चासत्राच्या उद्घाटन समारोहाचे अध्यक्षस्थान कुलगुरू प्रो हरेराम त्रिपाठी यांनी भूषविले. कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, चर्चासत्राच्या समन्वयिका आणि संस्कृत व संस्कृतेतर संकायाच्या अधिष्ठाता प्रो. कविता होले व्यासपीठावर विशेषत्वाने उपस्थित होत्या.
या चर्चासत्राचे उद्घाटन वेदमंत्रांच्या उद्घोषात मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. विश्वविद्यालय गीतानंतर या चर्चासत्र आयोजनामागची भूमिका कुलसचिव प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांनी प्रास्ताविकाद्वारे स्पष्ट केली. श्रीरामरायाच्या रामटेक येथे आयोजित श्रीराम महासंस्कृती महोत्सवात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याचा आनंद असून महाकवी कालिदासाच्या विविध शास्त्रपैलूंचा परामर्श या चर्चासत्राद्वारे घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
विशेष वक्ता संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी “महाकवी कालिदासाच्या साहित्यातील वैश्विक दृष्टी” या विषयावरील आपल्या प्रभावी भाषणाद्वारे महाकवी कालिदासाच्या विविध काव्यांमधील संदर्भ देवून त्याची वैश्विक जीवनदृष्टी प्रतिपादन केली. महाकवी कालिदास हा आपल्या काव्यांमधील मंगलाचरणाद्वारे सर्वाच्या कल्याणाची कामना केली आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ने विश्व हेच आपले घर आणि या विश्वात राहणा-या सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणाची भावना या अभिज्ञानशाकुंतलमधील मंगलाचरणात अतिशय खुबीने कालिदासाने व्यक्त केली आहे. त्याच्या काव्यातील या वैश्विक विचारांनी महाकवी कालिदास हा केवळ भारताचा कवी न राहता वैश्विक कवी होतो, सर्वाचाच कवी होतो. समाजाची संस्कृती ही समाजाचा व्यवहार, भाषा, साहित्य, बौद्धिक, भौतिक, भावनिक, आध्यात्मिक चेतनेतून दिसून येते. भारतीय संस्कृतीतील त्याग, तपस्या यांचे महत्त्वही कालिदासाने रघुवंशम्, कुमारसंभवम् यातून प्रतिपादिले आहे. भारतीय संस्कृतीत बाह्य, भौतिक रूपाला, क्षणिक सौंदर्याला महत्त्व नसून आंतरिक सौंदर्याला आपण महत्त्वाचे मानतो. तपस्या ही आत्मिक उन्नती साठी असते; या मूलभूत विचारांमुळेच आपला मूल्यविचार भक्कम आहे. उचित-अनुचित मधील विवेक हे धर्माच्या मूलस्थानी आहेत आणि त्यातूनच आपल्याला कर्माचा विवेक येतो. धर्मकर्माच्या विवेकी आचरणातूनच आत्मशुद्धी होते. या सर्व तत्त्वांचे उपयोजन आपल्याला चारही वर्णाश्रमांमध्ये बघावयास मिळते. या सर्व तत्त्वांबरोबरच शास्त्रज्ञानासह शस्त्रज्ञानाचे शिक्षणही महत्त्वाचे मानले आहे आणि रघुवंशात तसा उच्चारही त्याने केला आहे.
सारस्वत वक्ता प्रो. उमा वैद्य या “कालिदासाच्या साहित्यातील भारतीयजीवनरचना पद्धती” या विषयावरील आपल्या व्यासंगपूर्ण भाषणात म्हणाल्या, संस्कृती हा अदृश्य संकल्पना आहे परंतु तिचे प्रतिबिंब जेव्हा आपल्या आचारात, उच्चारात, विचारात दिसून येते यालाच जीवनपद्धती म्हणतात. कालिदासाच्या साहित्यातील जीवनपद्धती ही श्रुतिपथगामी म्हणजेच वैदिक संस्कृतीनिष्ठ जीवनपद्धती आहे. त्याने त्याच्या पात्रांद्वारे जीवन तत्त्वज्ञानाचे दर्शन घडविले आहे. कार्यसिद्धीसाठी तपस्या, परिश्रम आवश्यक आहेत, त्याने ते प्रत्यक्ष शंकरालाही करायला लावले आहे. महाकवी कालिदास हा रसिक आहे; सौंदर्याचा भोक्ता आहे. त्याने जीवनाचा भरभरून आस्वाद घेण्याचे आपल्या काव्यातून विशद केले आहे. श्रेयस् आणि प्रेयस् यांचा समतोल कसा राखावा हे ही तो आपल्या पात्रांच्या माध्यमातून सूचित करतो. कालिदास हा विविध प्रकारे आणि मार्गानी आश्रमव्यवस्थेला अनुसरून आदर्श जीवनपद्धतीच्या श्रेयस्कर मार्गाचा निर्देश करतो.
विशेष अतिथी आशीष जयस्वाल यांनी महाकवी कालिदासावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन अत्यंत कमी वेळेत केल्याबद्दल कुलगुरू महोदयांचे आभार मानले. संपूर्ण महासंस्कृती उत्सवातील हा कार्यकम रामटेकचे भूषण असलेल्या कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात होत असल्याचा आनंद असून, हा कार्यकम म्हणजे आत्मा असल्याचे उद्गार काढले. या विश्वविद्यालयामुळेच रामटेकचे महत्त्व आणि माहात्म्य आम्हाला समजले. हा कार्यकम स्वतः प्रभु रामचंद्रांनीच घडवून आणला असल्याची माझी श्रद्धा आहे. डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि प्रो. उमा वैद्य यांची अभ्यासपूर्ण व प्रभावी भाषणे ऐकून या दोघांच्याही भाषणांची मालिका यु-ट्युब चॅनेल साठी तयार करावी अशी सूचनाही त्यांनी कुलगुरू महोदयांना केली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी महाकवी कालिदासाची काव्ये ही शिरोधार्य आहेत. त्याग व तपस्या ही त्याच्या काव्यातील महत्त्वाची मूल्ये असून, आपले जीवन हे त्यागपूर्वक उपभोग घ्यावा यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाकवी कालिदासाच्या काव्यातील सेवा, सामाजिक जाणीव, आश्रमविचार, धर्मानुगामी जीवनपद्धती हे सर्व आजही प्रासंगिक आहे. रघुवंशात आदर्श राजा कसा असावा याचे सविस्तर वर्णन कालिदासाने केले आहे. शैशवात केवळ विद्याध्ययन, यौवनात सर्व सुखांचा धर्मपूर्वक उपभोग, पितृ, ऋषी व समाजऋणातून उन्ॠण होण्याचा प्रयत्न करणे, त्यानंतर वानप्रस्थ आणि मग वैराग्यपूर्वक जीवनयापन याप्रकारे जीवनपद्धतीचा अंगिकार रघुवंशातील राजांनी केला होता. राममंदिर प्राणप्रतिष्ठा समारोहाच्या पार्श्वभूमीवर रामटेक येथे श्रीराम महासंस्कृती महोत्सवात आमदार आशीषजी जयस्वाल यांच्या सहकार्याने हे चर्चासत्र आम्ही आयोजित करू शकलो याकरिता त्यांनी जयस्वाल यांना धन्यवाद दिले. जयस्वालजी यांनी सुचविल्याप्रमाणे विद्वानांच्या व्याख्यानमालिकेचे युटयुब चॅनेलवर प्रसारण करण्यात येईल असे आश्वासनही याप्रसंगी कुलगुरू महोदयांनी दिले.
कार्यक्रमाचे संचालन सहसमन्वयक डॉ. राजेंद्र जैन यांनी केले तर आभार समन्वयिका प्रो. कविता होले यांनी मानले. या राष्ट्रीय चर्चासत्रामधील दोन सत्रांमध्ये प्रो. मधुसूदन पेन्ना, प्रो. नंदा पुरी, प्रो. कृष्णकुमार पाण्डेय, प्रो. कविता होले, प्रो. प्रसाद गोखले, प्रो. ललिता जोशी, प्रो. कलापिनी अगस्ती, प्रो. हरेकृष्ण अगस्ती, प्रो. पराग जोशी, डॉ. जयवंत चौधरी या विद्वानांनी महाकवी कालिदासाच्या साहित्यातील विभिन्न पैलूंवर आपली व्याख्याने सादर केली. या चर्चासत्राच्या सफल आयोजनासाठी मा कुलसचिव प्रो कृष्णकुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समन्वयक प्रो कविता होले यांच्या नेतृत्वाखाली सह समन्वयक डॉ राजेंद्र जैन आणि त्यांच्या चमूने प्रयत्न केले.