उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जैवशास्त्र या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन

जळगाव : देशाच्या विकासात संशोधन आणि तंत्रज्ञान हे घटक महत्वाचे असून नव्या पिढीने आपल्या क्षेत्रात हे घटक आत्मसात करून आत्मनिर्भर भारत होण्यासाठी योगदान द्यावे अशी अपेक्षा भारताच्या कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष तथा परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ सी डी मायी यांनी व्यक्त केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जैवशास्त्र प्रशाळेच्या वतीने दि ३० व ३१ जुलै रोजी जैवशास्त्र या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाला प्रारंभ झाला. या परिसंवादाचे उद्घाटन करतांना डॉ मायी बोलत होते. कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंचावर प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे, प्रशाळेचे संचालक प्रा ए जी इंगळे, संयोजन सचिव प्रा भूषण चौधरी व प्रा के एस विश्वकर्मा उपस्थित होते.

डॉ मायी म्हणाले की, अफ्रिकन देशात जीएम टेक्नॉलॉजीच्या वापरामुळे अन्नधान्यात  स्वयंपूर्णता आली असून त्यावर साधक-बाधक चर्चा सुरु आहे. बीटी कापूस, बीटी वांगे याबद्दल चर्चा करतांना डॉ मायी यांनी कृषी क्षेत्रात मोठे बदल होत असल्याचे नमूद केले. जेनिटिक्सवर आधारीत  तंत्रज्ञानामुळे भारतातील अन्नधान्य, फळेभाज्या यांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. कृषी क्षेत्र हे मुलत: जैवशास्त्र आहे. यामध्ये मोठा वाव आहे. मात्र संशोधनासाठी विद्यार्थी येत नाहीत. कृषी विद्यापीठांत अपुरा निधी आणि शिक्षकांच्या असलेल्या रिकाम्या जागा यामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. कृषी क्षेत्रात मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. विज्ञान व तंत्रज्ञान आणि संशोधन हे विद्यापीठांचे अवयव आहेत. तेव्हा तरूण पिढीने शिकत असतांना संशोधन आणि तंत्रज्ञान याबाबत अधिक माहिती आत्मसात करावी आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन डॉ मायी यांनी केले.

Advertisement

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा व्ही एल माहेश्वरी यांनी संशोधनासाठी आवड, धीर आणि चिकाटी हे गुण महत्वाचे असून संशोधनाचा वापर औद्योगिक आणि व्यावसायिक कारणांसाठी करावा असे आवाहन केले. अवलोकन, आकलन आणि विशेषण यातून नाविन्यपूर्ण संशोधन आकाराला येते. मानवी जीवनासाठी संशोधन मोलाचे असल्याचे प्रा माहेश्वरी म्हणाले. प्रारंभी संचालक प्रा ए जी इंगळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा प्रवीण पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा भूषण चौधरी यांनी आभार मानले.

 उद्घाटनानंतर अमरावती येथील प्रा सतीश मालोदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात पुणे येथील डॉ अशोक गिरी, जळगावचे डॉ बाल कृष्णा यादव यांचे व्याख्यान झाले. दुसरे सत्र डॉ कानन पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी आय पी आर चेअर प्रोफेसर प्रा डी जी हुंडीवाले, मुंबईच्या पेटंट मुख्य कार्यालयातील संयुक्त नियंत्रक डॉ दिनेश पाटील यांचे व्याख्यान झाले. तिसरे सत्र प्रा पी पी माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाले यामध्ये डॉ सी डी मायी, नंदुरबार येथील वैज्ञानिक डॉ जयंत उत्तरवार यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर पोस्टर्स प्रदर्शन झाले.

बुधवार दि ३१ जुलै रोजी सकाळचे सत्र छत्रपती संभाजीनगर येथील डॉ सतीष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. त्यामध्ये पुणे येथील डॉ मुनीष कुमार, इंदौर येथील प्रा मिता जैन यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर तुमसर येथील डॉ के एन साठवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सत्रात पुणे येथील डॉ प्रशांत ढाकेफळकर, इंदौर येथील डॉ सुनीता कटारीया यांचे व्याख्यान होईल. दुपारी या परिसंवादाचा समारोप डॉ सी डी मायी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून प्र-कुलगुरू प्रा एस टी इंगळे अध्यक्षस्थानी राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page