कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेत “पर्यावरण, भूशास्त्र आणि वायुमंडलीय संशोधनाच्या क्षेत्रातील प्रगती” या विषयावर झालेल्या राष्ट्रीय परिषदेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये १३५ जण सहभागी झाले होते. मंगळवार दि.५ मार्च रोजी झालेल्या या परिषदेचे उद्घाटन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील पर्यावरण विभागातील प्रा. सतीष पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे होते.
विशेष अतिथी म्हणून भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेचे वैज्ञानिक डॉ. भूपेंद्र बहादूर सिंग, प्रा. आर. ई. मार्टीन उपस्थित होते. आयेाजन सचिव डॉ. के. पी. दांडगे यांनी प्रास्ताविक केले. संयोजक प्रा. एस. एन. पाटील यांनी प्रशाळेची माहिती दिली. उद्घाटक प्रा. सतीश पाटील यांनी जागतिक तापमान वाढ व जल वायु परिवर्तन याची कारणे व प्रतिबंधक उपाय यावर विवेचन केले. प्रा. एस. टी. इंगळे यांनी शाश्वत विकास ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या परिषदेत १३५ जणांनी नोंदणी केली. त्यापैकी ४३ जणांनी शोध निबंध सादर केले. उत्कृष्ट शोध निबंध सादरीकरणासाठी जैवशास्त्र प्रशाळेचे प्रसाद जपे तसेच उत्कृष्ट भित्तीपत्रक सादरीकरणासाठी रसायन तंत्रज्ञान संस्थेचे शिवराज ढोले यांना पारितोषिक प्राप्त झाले. प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. थोरात, सहसंयोजक प्रा. एस. बी. अत्तरदे, सहसचिव डॉ. व्ही. एम. रोकडे यावेळी उपस्थित होते. डॉ. भूपेंद्र बहादूर सिंग यांच्या उपस्थितीत परिषदेचा समारोप झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रज्ञा केदार हिने केले. मयुरी पाटील हिने आभार मानले.