गोंडवाना विद्यापीठात मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन
झाडीबोली साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करायला हवा – डॉ. परशुराम खुणे
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी झाडीपट्टी रंगभूमीचे जेष्ठ नाट्यकलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे ‘ झाडीपट्टी रंगभूमीचे वास्तव ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कार्यक्रम समन्वयक म्हणून मराठी विभागाच्या स. प्राध्यापिका डॉ. सविता गोविंदवार मंचावर उपस्थित होते.
प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांनी अध्यक्षीय भाषणात पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांसारख्या व्यक्तिमत्त्वाला मराठी विभागाने आमंत्रित केले, ही गौरवाची बाब असून विद्यार्थ्यांनी डॉ. परशुराम खुणे यांच्या गुरनोली ते पद्मश्री या झाडीपट्टी रंगभूमीच्या प्रवासातून प्रेरणा घ्यावी. साहित्य वाचावे, जगावे व जीवनाचा आनंद घ्यावा, असे सांगितले. त्याचप्रमाणे लुप्त होत जाणाऱ्या लोककलांचे महत्त्व व संवर्धनाची गरज विषद केली व मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या पदाधिकारी विद्यार्थ्यांना मंडळाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अतिथींचा परिचय मराठी विभागाचे स. प्रा.डॉ. हेमराज निखाडे यांनी करून दिला.
पद्मश्री डॉ. परशुराम खुणे मार्गदर्शनात म्हणाले की, ‘तुम्ही सर्व विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठात शिकत आहात तेव्हा आपल्या विदर्भाचा अभिमान असलेल्या झाडीपट्टी रंगभूमीची वैशिट्ये जाणून झाडीबोली साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करावा. येथील नाटकांचे आणि या रंगभूमीच्या वास्तव्याचे अध्ययन करावे. कलेला आपलेसे करून यात सामील व्हावे.’ याप्रसंगी त्यांनी सद्यपरिस्थितीत निर्माण झालेली या रंगभूमीची वास्तविकता मांडली व दंडार या लोककलेची माहिती विद्यार्थ्यांना दिली. मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीतील विद्यार्थ्यांचे अतिथींच्या हस्ते पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सविता गोविंदवार यांनी केले. यामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देताना ‘मराठी शाळांचे भवितव्य’ यावर परिसंवाद, कवितेचे रसग्रहण उपक्रम, विद्यार्थ्यांची आत्मकथने, स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषेचे महत्त्व, यशस्वी सुत्रसंचालनकर्ता, वाचनापासून तरुण वर्ग दूर गेला आहे काय? यावर चर्चा परिसंवाद इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी मंडळाची कार्यकारिणी घोषित केली.
कार्यक्रमात मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष शुभम गुरनुले, उपाध्यक्ष कु. माधुरी मेश्राम, सचिव डाकराम कोहपरे, कोषाध्यक्ष रेशमा मडावी आणि मंडळातील इतर सदस्य विद्यार्थ्यांचे अतिथींच्या हस्ते पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातील स. प्रा.डॉ. निळकंठ नरवाडे यांनी तर आभार स. प्रा. अमोल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.