महाराष्ट्र शासनाच्या ‘महाज्ञानदीप’ या ऑनलाईन शैक्षणिक पोर्टलचे लोकार्पण
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नेतृत्वात पाच विद्यापीठे कार्यरत
नाशिक : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘ १०० दिवस – गतिमान प्रशासन ‘ अभियान अंतर्गत ‘महाज्ञानदीप’ या महाराष्ट्र राज्य शासनाच्या ऑनलाईन शैक्षणिक पोर्टलचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आज बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी दहा वाजता ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखालील राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व एसएनडीटी विद्यापीठ मुंबई ही पाच विद्यापीठे या उपक्रमाची स्थापक विद्यापीठे म्हणून काम करत आहेत.

यावेळी बोलतांना मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी या पोर्टलद्वारे सर्वाना माफक शुल्कात हे शिक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच विद्यार्थ्यांना यासंदर्भात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देखील पोर्टलवर उपलब्ध करून द्यावी असे निर्देश दिले. तसेच त्यांनी काही मार्गदर्शक सुचना देखील केल्या. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करतांना या पोर्टलद्वारे जागतिक स्तरावरील गुणवत्तेच्या शिक्षणक्रमांची निर्मिती करून देशाला ते उपलब्ध करून देण्याविषयीची सूचना केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सजीव सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी ‘महाज्ञानदीप’ पोर्टलच्या कार्यप्रणाली विषयी प्रात्यक्षिकासह माहिती देत आजचा दिवस महाराष्ट्रातील ऑनलाईन उच्चशिक्षणासाठी सुवर्णक्षण असल्याचे सांगितले.
या पोर्टलवर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० ( NEP – 2020) नुसार ‘भारतीय ज्ञान प्रणाली – जेनेरिक’ ( IKS – Indian Knowledge System – Generic) हा मराठी भाषेतील शिक्षणक्रम देखील अपलोड करण्यात आला. जो आता जगभरातील मराठी भाषिक व अभ्यासक यांना उपलब्ध असेल. अशा प्रकारचे डिजीटल शिक्षणाचे पोर्टल शासनाच्या अधिपत्याखाली राज्यस्तरावर देशात प्रथमच महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ‘महाज्ञानदीप पोर्टल’ म्हणून निर्माण केले आहे.
यावेळी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ शैलेश देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई विद्यापीठांचे कुलगुरू, कुलसचिव, आयआयटी गांधीनगरचे प्रा समीर सहस्त्रबुद्धे, यांच्यासह मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील, स्कूल ऑफ डिजीटल एज्युकेशनच्या संचालिका डॉ कविता साळुंके, प्रा गणेश लोखंडे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र बनसोडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे संचालक, प्राध्यापक, अधिकारी उपस्थित होते.
कुलगुरू प्रा संजीव सोनवणे यांची प्रतिक्रिया –
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कल्पक मार्गदर्शना नुसार ही ऑनलाईन उच्च तंत्रशिक्षण व्यवस्थेची संकल्पना प्रत्यक्षात साकारली गेली. राज्यातील सर्व विद्यापीठांच्या सहकार्याने सर्वाना समान संधी व गुणवत्ता आधारित तत्वानुसार विविध विषयांचे ऑनलाईन उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. सदर पोर्टल हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने विकसित केले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून यावर दोन ते चार क्रेडिटचे शिक्षणक्रम उपलब्ध होतील. त्यात आठ ते दहा मिनिटांचे तज्ञ शिक्षकांचे व्हिडीओ, त्यास पूरक संदर्भ वाचनसाहित्य उपलब्ध केले जाईल. विद्यार्थ्यांच्या सवडीनुसार त्यांचे ९० तासांचे अधय्यान झाल्यानंतर ऑनलाईन परीक्षा होतील. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अपार आयडीवर क्रेडिट जमा केले जाईल. ज्याचा त्या विद्यार्थ्याना त्यांच्या पदवीसाठी उपयोग होईल.
या पोर्टलवर प्रारंभी भारतीय ज्ञान प्रणाली, पर्यावरणशास्त्र, मूल्यशिक्षण आणि त्यानंतर इतर विविध विषयांचे शिक्षणक्रम यावर उपलब्ध केले जातील. यासाठी राज्यातील विविध विद्यापीठांच्या जवळपास २०० प्राध्यापकांना ऑनलाईन शिक्षणासाठी ई- अभ्यास साहित्य तयार करण्याचे प्रशिक्षण आयआयटी मद्रासच्या सहाय्याने देण्यात आले आहे. लवकरच एकूण एक हजार प्राध्यापकांना ऑनलाईन ई साहित्य (MOOC) विकसन करण्याचे प्रशिक्षण देण्याचा मुक्त विद्यापीठाचा निर्धार आहे.