गोंडवाना विद्यापीठात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केद्रांचे उद्घाटन

महात्मा फुले यांचे जीवनचरित्र आत्मसात करण्याची गरज – डॉ विजय राठोड

गडचिरोली : महात्मा फुले यांच्या कार्याचा अवाका फार मोठा आहे. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. महात्मा फुले शिक्षणासाठी समर्पित भावनेने झटले असून त्यांनी पुण्यामध्ये भिडेवाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढली. समताधिष्ठीत समाजाच्या निर्मीतीमध्ये महात्मा फुलेंनी मोलाचे योगदान दिले आहे. भावी पिढीने त्यांचे जीवन व चरित्र आत्मसात करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आर एस मुंडले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा डॉ विजय राठोड यांनी केले. गोंडवाना विद्यापीठ येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे, उद्घाटक म्हणून आर एस मुंडले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा डॉ विजय राठोड, अधिसभा सदस्य डॉ नथ्थुजी वाढवे, मानव विज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ धनराज पाटील, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केद्रांच्या समन्वयक डॉ रजनी वाढई, डॉ प्रफुल नांदे, डॉ माधुरी कोकोडे, डॉ संदेश सोनुले, डॉ सुषमा बनकर आदी उपस्थित होते.

प्रा डॉ विजय राठोड म्हणाले, महात्मा फुले यांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज आहे. फुलेंच्या वेदनेतून, पिडेतून साहित्याची निर्मीती झाली. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. महात्मा फुले यांच्या नावाने अध्यासन केंद्र सुरु होत असून गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थी या विद्यापीठात ग्रंथसंपदा, साहित्य, तसेच पेटंट निर्मीती करतील. त्यासोबतच, प्रा डॉ विजय राठोड यांनी एकदंरीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्य तसेच साहित्यावर प्रकाश टाकला.

Advertisement

अध्यक्षीय भाषण करतांना प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठात महामानव, थोरपुरुष तसेच संताच्या नावाने दहापेक्षा अधिक अध्यासन केंद्र कार्यान्वित आहे. महामानव, थोरपुरुष तसेच संतानी केलेल्या कार्याला उजाळा देणे, त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणे तसेच विद्यार्थ्यांना त्या महापुरुषांनी केलेल्या कार्याची महती व्हावी, यासाठी विविध अध्यासन केंद्र विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आले आहे. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी त्याकाळी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आज महिला शिक्षीत होवून विविध क्षेत्रात पुढे येत आहे. विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांचे चरित्रग्रंथ अभ्यासावे आणि त्यापासून प्रेरणा घ्यावी. शिक्षणामुळेच मानवाचा तसेच देशाचा विकास होत असल्याचे प्र-कुलगुरु डॉ श्रीराम कावळे म्हणाले.

प्रास्ताविकेत बोलतांना अधिसभा सदस्य डॉ नथ्थुजी वाढवे म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक सामाजिक व शैक्षणिक कार्ये केली. त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार होण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्याची महती भावी पिढीला व्हावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या अध्यासनाची निर्मीती करण्यात येत असल्याचे डॉ वाढवे यांनी सांगितले.

मान्यवरांचा परिचय क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केद्रांच्या समन्वयक डॉ रजनी वाढई यांनी करुन दिला.

तत्पुर्वी, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तसेच दिपप्रज्वलपन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा अतुल गावस्कर यांनी तर आभार प्रा डॉ रविंद्र विखार यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page