गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन संपन्न
प्रत्येकाने जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जीवन हे अंगिकरावे; ह.भ.प.रामायनाचार्य संजय महाराज पाचपोर
गडचिरोली : जे जाते पण परत येत नाही ते आहे तारुण्य! म्हणूनच चांगल्या संधीचा फायदा सर्व तरुणांनी घेतला पाहिजे, आपल्या पुढील आव्हाने स्वीकारली पाहिजेत. तरुण हा शारीरिक, मानसिक, बौध्दिक व नैतिकदृष्ट्या समर्थ व संपन्न असले पाहिजेत. चांगली माणसे आयात करता येत नाहीत, ती घडवावी लागतात. म्हणूनच घडलेल्या तरुणांशिवाय या देशाला तरणोपाय नाही. आपल्या मध्ये असलेली प्रामाणिकता ही देवाने दिलेला आरसा आहे. प्रामाणिकता गेली की अधोगती सुरू होते.प्रत्येकाने जगद्गुरू तुकाराम महाराजांचे जीवन हे कृतीने अंगिकरावे असे मत उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक , आळंदी येथील ह.भ.प.रामायनाचार्य संजय महाराज पाचपोर यांनी व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठात जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे उद्घाटन नुकतेच पार पडले. त्यावेळी ते ‘तरुणांसाठी संत तुकाराम महाराज’ या विषयावर बोलत होते. अनेक ओव्या आणि अभंगांमधून त्यांनी संत तुकाराम महाराजांचे महात्म्य आणि त्यांच्या विचारांची समाजाला असलेली आवश्यकता त्यांनी विषद केली. यावेळेस त्यांच्या वाणीने सभागृहातील वातावरणही मंत्रमुग्ध झाले. महात्मा गांधी तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रम प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विशेष अतिथी म्हणून ,संयोजक सृष्टी संस्था, येरंडी ,केशव गुरनुले, प्राचार्य शांताराम बुटे, अधिसभा सदस्य दिलीप चौधरी, ह.भ.प.सोपान कनेरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगतात प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे म्हणाले, जे महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्या विचारांवर राष्ट्र उभे आहे.त्यांचे विचार हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हे आमचे परम कर्तव्य आहे .त्यांनी केलेले कार्य आजही जशाने तसे लागू पडते. त्यांचे अभंग मुखतगत असावे असेच आहेत. संत महापुरुषांना जाती धर्मात वाटून न घेता त्यांचे विचार हे मानव जातीच्या कल्याणासाठी कसे आहे याची जाण ठेवावी.असे ते म्हणाले. आपल्या मनोगतात सिनेट सदस्य दिलीप चौधरी म्हणाले, वारकरी पंथातील अखेरचे संत तुकाराम. संत तुकाराम नावाच्या बहुआयामी संताच्या अध्यासन निर्मितीतून त्यांच्या अभंग गाथेचा संशोधनात्म अभ्यास करणे. तुकारामाच्या एकूणच साहित्याचे केंद्र निर्माण करणे, विद्यापीठ आणि शाळा ,महाविद्यालयात अभंगगाथा यावर आधारित परीक्षा आयोजित करणे. तुकारामांनी दिलेल्या सुभाषित संग्रह करणे, सामाजिक दृष्टीने वेगवेगळे उपक्रम राबविणे. तुकारामाच्या साहित्यावर वेगवेगळ्या अगांने व्याख्यानमाला, चर्चासत्राचे, परिसंवादाचे आयोजन करणे असे अनेक उद्दिष्ट समोर ठेवून जगद्गुरू संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्र विद्यापीठात स्थापन करण्यात आले आहे.
ह.भ. पा. सोपान कनेरकर , सृष्टी संस्थेचे संस्थापक केशव गुरनुले, यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक या अध्यासन केंद्राचे समन्वयक, स. प्रा. डॉ. हेमराज निखाडे , संचालन मराठीचे स. प्रा.नीलकंठ नरवडे, तर आभार कॉम्पुटर सायन्स विभागाचे डॉ. कृष्णा कारू यांनी मानले .या कार्यक्रमाचा लाभ शिक्षक, शिकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रमाला सिनेट सदस्य धर्मेंद्र मुनघाटे, यश बांगडे , सतीश पडोळे तसेच या अध्यासन केंद्राच्या समितीतील अमरावती येथील शामबाबा निचीत्, मराठी विभाग प्रमुख सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर,डॉ. विद्याधर बनसोड, मराठी विभाग प्रमुख गोविंदराव मुनघाटे महाविद्यालय, कुरखेडा डॉ. नरेंद्र आरेकर आदींची तसेच शहरातील गणमान्य नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.