गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
तापमानवाढ रोखण्यास सूर्यघर योजना प्रभावी ठरेल – खा डॉ भागवत कराड
‘शाश्वत विकास, पर्यावरण व समाज कल्याण’ यावर मंथन
छत्रपती संभाजीनगर : पीएम सुर्य घर योजनेच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घरातील सोलार पॅनेल उभारण्यास व त्यातून वीजनिर्मिती करण्यास सरकार अनुदान पुरवत आहे. ही योजना जागतिक तापमानवाढ रोखण्यास प्रभावी ठरेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा डाॅ भागवत कराड यांनी केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेत (जीएमएनआयआरडी) आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवारी (दि १४) करण्यात आले.
सिफार्ट सभागृहात दिवसभर कुलगुरु डॉ विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद घेण्यात आली. माजी केंद्रीय राज्यमंत्री खा डॉ भागवत कराड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्र-कुलगुरु डॉ वाल्मिक सरवदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलपती नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ गजानन सानप, संस्थेचे संचालक डॉ संजय साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बँकॉक येथील डॉ अरुण चैनीट यांचे ऑनलाइन बीजभाषण झाले. मपॅरिस करारातील शाश्वत विकासाच्या १७ उद्दिष्टांचे मानवी विकासात मोलाची भूमिका बजावतील असे डॉ अरूण चैनीट बीजभाषणात म्हणाले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र-कुलगुरू डाॅ वाल्मिक सरवदे यांनी मराठवाड्याच्या ग्रामीण विकासात संस्थेचे योगदान मांडले. यावेळी कुलपती नियुक्त विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य डाॅ गजानन सानप यांनी संस्थेच्या उभारणीचा इतिहास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधका पुढे मांडला. शाश्वत विकास, पर्यावरण व समाज कल्याण: प्रश्न आणि आव्हाने’ या विषयावर ३० शोधनिबंध परिषदेत सादर झाले, अशी माहिती संचालक डॉ संजय साळुंके यांनी दिली. या प्रसंगी संस्थेचे संचालक डाॅ संजय साळूंखे, माजी संचालक डाॅ सर्जेराव ठोंबरे, डाॅ रमेश पांडव, डाॅ शहापूरकर, स प्राध्यापक बसवेश्वर शिवदास बिरादार व इतर मान्यवर उपस्थित होते. परिषदेच्या आयोजनात डाॅ कृष्णा कांबळे, डाॅ उषा वटाणे, शैलेश माकणकर, बाबासाहेब बोधने, सोमीनाथ वाघ यांनी भूमिका बजावली. परिषदेत दिवसभर विविध सत्रात ‘शाश्वत विकास, पर्यावरण व समाज कल्याण: प्रश्न आणि आव्हाने’ या विषयावर दिवसभर मंथन झाले.