संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात आंतरविद्याशाखीय विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळेचे उद्घाटन
आजच्या युवापिढीपर्यंत मराठी विश्वकोश पोहोचणे आवश्यक – कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते
अमरावती : “आजच्या युवापिढीपर्यंत मराठी विश्वकोश पोहोचणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असेल, तर त्या त्या क्षेत्रांतील नवनवे ज्ञान, नवनवी माहिती आणि अद्यावत कौशल्ये आत्मसात करावी लागतात, त्यासाठी कोशवाङ्मय हे उपयुक्त साधन आहे”, असे प्रतिपादन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह येथे आयोजित आंतरविद्याशाखीय विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळेचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

यावेळी विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ रवींद्र शोभणे, मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता व मराठी विभागप्रमुख प्रा डॉ मोना चिमोटे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी साहाय्यक डॉ जगतानंद भटकर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डॉ रवींद्र शोभणे म्हणाले की, विश्वकोशातील नोंदी लिहिताना आधाराला घेतलेली माहिती विश्वासार्ह असावी लागते. त्यामुळे लेखकांनी नोंदी लिहिण्याचे काम निष्ठेने आणि चिकाटीने केले पाहिजे. त्यांच्या विश्वासार्हतेवर विश्वकोशाची समृद्धी अवलंबून असते.
प्रास्ताविक करताना डॉ चिमोटे यांनी विश्वकोश नोंदलेखन कार्यशाळेच्या आयोजनाची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून मांडली. ज्ञानाच्या शाखा अधिकाधिक विस्तारल्या पाहिजेत, हा सद्हेतू या कार्यशाळेच्या आयोजनाचा आहे, असा मानस त्यांनी व्यक्त केला. विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहाय्यक डॉ जगतानंद भटकर यांनी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या निर्मितीमागील प्रेरणा व निर्मिती, संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अथक प्रयत्नाने झाली असे सांगून त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला.
कार्यशाळेच्या ‘मराठी विश्वकोश नोंदलेखन परंपरा’ या विषयावरील पहिल्या सत्राचे अध्यक्षपद अधिष्ठाता प्रा डॉ मोना चिमोटे यांनी भूषवले. तसेच प्रमुख वक्ते म्हणून डॉ जगतानंद भटकर यांनी मार्गदर्शन केले. संशोधन प्रक्रियेत कोशवाङ्मय हा प्राथमिक व महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी विश्वकोश हा महत्त्वाचा आधार आहे, असे मत डॉ चिमोटे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात व्यक्त केले. या सत्रात डॉ जगतानंद भटकर यांनी कोश निर्मितीच्या परंपरेत व्यं केतकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तसेच वसंत आबाजी डहाके यांच्या योगदानाचा मागोवा घेतला. आतापर्यंत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने १८ हजार नोंदीची वीस खंडे व एक सूचीखंड असा प्रदीर्घ प्रवासाचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच आगामी काळासाठी ज्ञान मंडळाची योजना विश्वकोश मंडळ तयार करत आहे. असेही त्यांनी सांगितले.
‘कोशसंस्कृती’ या विषयावरील दुसरा सत्राचे अध्यक्ष मराठी विभागाचे प्रा डॉ माधव पुटवाड तसेच वक्ते म्हणून मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ काशीनाथ बऱ्हाटे, प्रा डॉ प्रणव कोलते व प्रा डॉ भगवान फाळके यांनी आपला सहभाग नोंदवला. नोंदलेखन हे मेहनतीचे तसेच जिकिरीचे काम आहे, असे मत डॉ माधव पुटवाड यांनी व्यक्त केले. तसेच प्रा डॉ प्रणव कोलते यांनी कोशनिर्मितीमध्ये धरव्यंकटेश केतकर यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा डॉ भगवान फाळके यांनी समग्र कोश व कोशसंस्कृतीचा अभ्यासपूर्ण आढावा घेत ज्ञानसाधनेसाठी व प्रसारासाठी कोश निर्मिती प्रक्रिया निरंतर सुरू असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सूत्रसंचालन अभिजित इंगळे यांनी, तर आभार डॉ प्रणव कोलते यांनी मानले. कार्यशाळेला संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.