नागपूर विद्यापीठात आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा निवड चाचणीचे उद्घाटन
सांस्कृतिक स्पर्धांमधून विविध संस्कृतीची ओळख -अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांचे प्रतिपादन
नागपूर : सांस्कृतिक स्पर्धांमधून विविध संस्कृतीची ओळख होत असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा निवड चाचणीस महाराज बाग चौक स्थित दीक्षांत सभागृहात गुरुवार, दिनांक १९ सप्टेंबर २०२४ पासून सुरुवात झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या निवड चाचणीचे उद्घाटन करताना डॉ कोरेटी मार्गदर्शन करीत होते.
प्रभारी कुलगुरू डॉ प्रशान्त बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अधिष्ठाता डॉ शामराव कोरेटी यांनी भूषविले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे व विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांची उपस्थिती होती. सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठे महत्व असल्याचे सांगत यातून स्मृती जपल्या जात असल्याचे डॉ कोरेटी पुढे बोलताना म्हणाले. या स्पर्धांमध्ये भाग घेणे म्हणजे सांस्कृतिक मूल्यांची आठवण करणे होय. राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होता आल्याने तेथील संस्कृतीची ओळख तुम्हाला होईल. अशा कार्यक्रमांमुळे विविध भागातील संस्कार, संस्कृती विद्यार्थ्यांना कळत असल्याचे डॉ कोरेटी म्हणाले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला सांस्कृतिक स्पर्धांची मोठी परंपरा लाभली आहे. निवड चाचणीत उत्कृष्ट प्रदर्शन करीत विविध स्पर्धांमध्ये विद्यापीठाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यशाचे शिखर गाठत देशाचे नेतृत्व करण्याची संधी अशा व्यासपीठांमधून मिळत असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ सोपानदेव पिसे यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे नाव राष्ट्रीय सेवा योजना तसेच सांस्कृतिक क्षेत्रात आदराने घेतले जात असल्याचे सांगितले. निवड चाचणी अत्यंत बारकाईने घेतली जात असून दोन्ही विभाग विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत असल्याचे ते म्हणाले. इंद्रधनुष्य स्पर्धा अकोला येथे तर पश्चिम क्षेत्रिय आंतर विद्यापीठ युवा महोत्सव गुजरात येथे होत आहे.
या चाचणीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय यापूर्वी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या पुरस्कारांची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ विजय खंडाळ यांनी उत्कृष्ट विद्यार्थ्यांची विविध स्पर्धांसाठी निवड केली जाणार असल्याचे सांगितले. सोबत सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. निवड चाचणीमध्ये एकूण ७७ महाविद्यालयातील ८१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
तीन दिवस चालणाऱ्या निवड चाचणीमध्ये संगीत, नृत्य, नाटक, साहित्यिक आणि ललित कला अशा ५ विभागातून २६ कला प्रकाराकरिता विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन करीत आभार सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी मानले.